तीर्थयात्रा?

– सुजाता येवले

(भाग 1)
काहीच दिवसांपूर्वी बातमी आली अमरनाथचे हिमशिवलिंग वितळले तसेच बर्फाचा थरदेखील आकुंचन पावतो आहे. मनाला खरे तर खूप वाईट वाटले. अमरनाथची यात्रा सगळ्यात अवघड म्हणून अगदी धीट मनाची मंडळीदेखील मन घट्ट करत यात्रा करायची. अमरनाथ, बद्रिनाथ, केदारनाथ, कैलासमानसरोवर, रामेश्वरम गंगोत्री, यमुनोत्री, वैष्णोदेवी इत्यादी या सर्वच अवघड यात्रा होत्या. आणि यात्रेकरू देखील धाडसी होते.
ज्या ज्या ठिकाणी निसर्गाने मनमुक्त सौंदर्याची उधळण केली आहे, ज्या ठिकाणाच्या निरव सौंदर्यात पहाड, वृक्षवेली, बर्फ या सगळ्यात निसर्गाची नवलाई आहे आणि तिथेच भाविक वैष्णव मनाला परमेश्वराचा अधिवास जाणवतो. ती सर्वच स्थळे म्हणजेच तीर्थस्थळे हे माझे स्वतःचे प्रामाणिक मत आहे. इतका सुंदर निसर्ग नजरेने प्यावा; मन बुद्धी आत्मा शरीर सात्वीकने भरून टाकावे; आत्मक्लेष, वंचना, राग, लोभ, मत्सर, द्वेष आणि तत्सम विकृती या सर्वांचा त्याग करून त्याच सात्त्विकतेने उर्वरित जीवन साधुसंतांसम कंठावे हा या तीर्थयात्रेचा
मूळ उद्देश.
पूर्वी ज्या वेळेला तीर्थयात्रेला जाऊन आलेल्यांची आम्ही भेट घ्यायला जायचो त्यावेळेला सर्वप्रथम आई-वडील संपूर्ण श्रद्धा भक्तीने त्यांच्या पायावर नतमस्तक व्हायचे. आम्हालाही डोकं टेकून नमस्कार करायला सांगायचे. मग ते आम्हाला त्यांचे अनुभव कथन करायचे. सांगताना त्यांचा चेहरा सात्त्विकतेने समाधानाने ओसंडून वाहत असायचा. नंतर त्या तीर्थस्थळांचा थोडसं तीर्थ हातावर घेऊन आम्ही ते प्राशन करून उरलेले मस्तकावर लावायचो. निघताना भेट म्हणून परमेश्वराचा छोटा फोटो, कुंकवाची छोटी पुडी, मुरमुरे, फुटाणे, हलवा, शेंगदाणे इतकाच खाऊ असायचा. चारधाम करून झाल्याचा तुरळक कोणाचातरी गंगा पूजनाचा सोहळा असायचा.
दर्शनासाठी पूर्ण गाव लोटायचा. भेटवस्तू देणे-घेणे असे काही नसायचे. दळणवळणाची साधने पुरेशी नव्हती. देवस्थानात पोहोचण्याचा पैसे देऊन अथवा सरकारी अधिकाराने व्हीआयपी मार्ग अस्तित्वातच नसावा. देवापुढे राव आणि रंग समान होते. तसेच एकत्र कुटुंबात डझनभराच्या पोरवड्यात, शेती, भाती, जनावरे, व्यापार यात गुरफटलेल्या सामान्य जनमानसाला सर्वच तीर्थ कामधंदा आणि घरातल्या माणसांमध्येच दिसायची. सोशल मीडिया इतकी बोकाळली नव्हती. त्यामुळे तीर्थयात्रांचे प्रमाणही कमी होते. गेल्या दोन-तीन दशकात मात्र तीर्थयात्रांचे प्रमाण इतके प्रचंड वाढले की कुठल्याही तीर्थयात्रेला न जाणारा माणूस परग्रहावरून आलाय की काय! असेच वाटते. तीर्थयात्रांचे नुसते प्रमाणच नाही वाढले तर त्यांचे स्वरूपही अमुलाग्र बदलले. खेडोपाडी, गावागावात, शहराशहरातून प्रवास सेवा उपलब्ध झाल्या. ट्रॅव्हलिंग एजंट तर गल्लोगल्ली नाक्या नाक्यावर उपलब्ध होऊ लागले. विद्यापीठांमध्ये त्यासाठी खास कोर्सेस सुद्धा निर्माण झाले. हवी ती माहिती सोशल मीडियावर उपलब्ध होऊ लागली. आणि घरातून सामान उचलून नेऊन परत घरातच व्यवस्थित पोहोचवण्याचीही आरामदायक सेवा सुरू झाली. आणि तीर्थयात्रा करण्याची चढाओढ लोकांमध्ये निर्माण झाली. कदाचितच एखादे घर असावे जिथे कोणी तीर्थयात्रेला गेले नाही. तीर्थयात्रेला जाण्यासाठी हल्ली खूप तयारीही करावी लागत नाही. पूर्वीसारखे चिवडा, लाडू, शंकरपाळी, तहानलाडू,
भूकलाडू वगैरे काहीच घ्यावे लागत नाही. रोज वापरायला लागणारे कपडे फक्त त्यातही अंत:वस्त्र बहुदा यूज अँड थ्रो या कॅटेगरीतले. वरचे कपडे सोबत न्यायचे. न धुता परत आणायचे. खिशात पैसे खुळखुळत असतील तर हॉटेलमध्ये लाँड्रिचीही सोय असते. बरे या तीर्थस्थळावर बॅगा उचलले आणि परत ठेवणे हासुद्धा त्रास नाही ना. प्रत्येक तीर्थ डेस्टिनेशनला साध्या हॉटेल पासून ते पॉश चकचकीत, ऑल सर्व्हिसेस व्हेलेबल इतक्या सुविधा असलेली हॉटेल्स उपलब्ध आहेत. देवाला किंवा देवीला चढवण्यासाठी लागणारी कपडे किंवा फळे, पानं, फुले हे मंदिराच्या चौथर्‍यांवरच विक्रीसाठी उपलब्ध असल्यामुळे बागेत, राना वनात कुठे शोधण्याची गरजही नाही. रस्तेसुद्धा हल्ली सरकार कृपेने वेलमेंटेन्ड आहेत. सरकारी आर्थिक व्यवस्थेत यात्रेकरूंनी गजबजलेली मंदिरे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात म्हणे. नियम सर्वधर्मनिरपेक्ष महान भारतात सर्वच धर्ममंदिरात सारखाच लागू झाल्यास बरे होईल. पूर्वी तीर्थयात्रेला वयस्कर निघाल्यानंतर मुले, मुली, सुना ढसाढसा रडायचे म्हणे.
हल्ली जास्त दिवसांच्या अवधीच्या यात्रांचे सासुसासर्‍यांसाठी बुकिंग करण्यासाठी मुली जावई यांची चढाओढ लागलेली असते. पैसे अर्थातच वृद्धांचे पेन्शन किंवा मुलांकडून वसूल करून. तीर्थयात्रेवरून परत येतांना लेकी जावयांसाठी आणि त्यांच्या प्रजेसाठी भरमसाठ गिफ्ट आणि भरभरून मनमुराद आशिर्वाद, यात्रेनंतरची दुखणी खुपणी काढण्यासाठी मुलगा, सून, नातूच तत्पर असतात. मज्जा आहे या वृद्धांची यात्रासुद्धा आनंदाने करतात. सोबत मुलगा, सून यांच्यासोबत त्यांच्या प्रत्येक प्रवासात अगदी हनिमून डेस्टिनेशनलासुद्धा आवडीने जातातच.
(क्रमश:)

Pilgrimage?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *