गोतस्करांची पोलिसांच्या वाहनाला धडक

चार गोवंशांची सुटका; पाठलागादरम्यान पोलीस निरीक्षक कैलास वाघ जखमी; दोघे ताब्यात

चांदवड : वार्ताहर
मुंबई-आग्रा महामार्गावरील घाट परिसरात गोतस्करी करणार्‍या भरधाव कारने पोलिसांच्या शासकीय वाहनाला जोरदार धडक देत पसार होण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या प्रकारात पोलीस निरीक्षक कैलास वाघ जखमी झाले. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत दोघा संशयितांना ताब्यात घेत चार गोवंशांची सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. 23) सकाळी साडेसहाच्या सुमारास रेणुका माता मंदिर चौफुली ते चांदवड चौफुली दरम्यान संशयास्पद हालचाल करणारी शेवरलेट कॅप्टिवा कार (क्र. एमएच 09 बीई 8080) पोलिसांच्या निदर्शनास आली. संबंधित वाहन थांबविण्यासाठी पोलिसांनी सायरन व इशारे दिले. मात्र चालकाने वाहन न थांबवता चुकीच्या दिशेने भरधाव वेगात कार चालवत पोलिसांच्या शासकीय वाहनाला समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात शासकीय वाहनाचे नुकसान झाले असून पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या पायाला दुखापत झाली. तरीदेखील पोलिसांनी तातडीने नाकेबंदी करून वाहन अडवत दोन्ही संशयितांना पकडले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अबु सुफियान अब्दुल करीम अन्सारी व मोहम्मद इरफान मोहम्मद अल्ताफ अन्सारी (दोघे रा. मालेगाव) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये चार नर जातीचे गोवंश अमानुष पद्धतीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सुमारे 17 हजार रुपये किमतीचे गोवंश ताब्यात घेत वाहन जप्त केले आहे.
या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करत आहेत.

Cow smugglers hit a police vehicle

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *