3.40 लाखांच्या 7 दुचाकी जप्त
मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव शहरातील स्थानिक दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. तीन लाख 40 हजार रुपये किमतीच्या सात चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तीन दिवसांपूर्वीच 11 चोरीच्या दुचाकी जप्त केल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एक मोठी कारवाई केली आहे.
मोसमपूल परिसरात दोन संशयित चोरीची दुचाकी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी साद मोहम्मद इफान (रा. रझा चौक, मालेगाव) व मोमीन मोहम्मद दानिश (रा. रमजानपुरा, मालेगाव) हे दोघे हिरो पॅशन-प्रो दुचाकीसह आढळून आले.
पोलिसांनी वाहनाच्या कागदपत्रांची विचारपूस केली असता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीदरम्यान संबंधित दुचाकी नया इस्लामपुरा परिसरातून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
पुढील तपासात साद मोहम्मद इफान व मोमीन मोहम्मद दानिश यांनी हमजा इस्तियाक अहमद (रा. मौलाना उमरेन चौक, गुलाब पार्क, मालेगाव) व सय्यद इजाज सय्यद यासीन (रा. नवीन फरान मागे, गुलाब पार्क, मालेगाव) यांच्या मदतीने शहरातील विविध भागांतून आणखी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी छापेमारी करून त्या दोघांनाही ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण सात चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत तीन लाख 40 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
Gang of two-wheeler thieves busted in Malegaon