‘नेस्ले’च्या उत्पादनांवर कठोर कारवाईचा बडगा

दिशाभूल करणारे खोटे दावे; तीन खटले दाखल; शिशू आहार आणि पेय उद्योगात खळबळ

मुंबई : प्रतिनिधी
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय)ने नेस्ले इंडियाच्या लहान मुलांच्या पोषण उत्पादनांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. दिशाभूल करणारे खोटे प्रचारात्मक दावे आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफएसएसएआयने नेस्ले इंडियाविरुद्ध तब्बल तीन खटले दाखल केले आहेत. या थेट कायदेशीर कारवाईमुळे देशातील शिशू आहार आणि पेय उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे.
या कारवाईचे मुख्य कारण नेस्लेच्या उत्पादनांमध्ये असलेल्या ‘बायोटिन’च्या पातळीबाबत प्रयोगशाळेत समोर आलेले निष्कर्ष आहेत. कंपनीने आपल्या शिशू आहाराच्या उत्पादनांवर बायोटिनच्या प्रमाणाबाबत जो दावा केला होता, त्यामध्ये आणि प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष चाचणीच्या अहवालात तफावत आणि अनियमितता आढळल्याने अन्न सुरक्षा प्राधिकरणाने यावर गंभीर आक्षेप नोंदवत ही कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

‘व्हे प्रोटीन’चे दावे सिद्ध करण्याचे आव्हान
लहान मुलांच्या आरोग्याशी निगडित उत्पादनांवर ग्राहकांचा मोठा विश्वास असतो; त्यामुळे अशा उत्पादनांबाबत कोणतीही तडजोड किंवा दिशाभूल खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश ‘एफएसएसएआय’ने या कृतीतून दिला आहे.

मार्केटिंग दाव्यांवरही ताशेरे
बायोटिनच्या मुद्द्यासोबतच, नेस्ले इंडियाकडून त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती आणि मार्केटिंगसाठी केल्या जाणार्‍या इतर दाव्यांवरही एफएसएसएआयने कडक ताशेरे ओढले आहेत. विशेषतः, लहान मुलांच्या पोषण उत्पादनांमध्ये ’5एचएमओ’ज आणि ’व्हे प्रोटीन’ असल्याचा दावा कंपनीकडून प्रामुख्याने केला जातो. हे दावे ग्राहकांची दिशाभूल करणारे असू शकतात, असा संशय व्यक्त करत प्राधिकरणाने या विशिष्ट दाव्यांबाबत कंपनीकडे तातडीने सविस्तर स्पष्टीकरण मागितले आहे.

Crackdown on Nestle products

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *