आस्वाद

कापडाच्या कचर्‍यातून रोजगाराची निर्मिती

– डॉ. किशोर पवार

आजच्या वेगवान औद्योगीकरणामुळे कापड उद्योगातून निर्माण होणारा वस्त्रोद्योगीय कचरा ही गंभीर पर्यावरणीय समस्या बनत आहे. कपड्यांच्या निर्मितीदरम्यान उरणार्‍या कापडाच्या कापण्या, तुकडे, दोषपूर्ण माल किंवा वापरात न आलेले कापड अनेकदा कचर्‍यात फेकले जाते. त्यामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. त्या तुकड्यांची विल्हेवाट कशी लावावी ही एक समस्या उभी राहते.दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक महिलांकडे कौशल्य असूनही घराबाहेर जाऊन नियमित रोजगार करण्याच्या मर्यादा असतात. या दोन्ही समस्यांना एकत्रितपणे हाताळण्याचा अभिनव प्रयत्न नोएडातील अवघ्या 17 वर्षीय राहिणी बन्सल या बुद्धिमान मुलीने केला आहे. विशेष म्हणजे राहिणीने दहावीच्या वर्गात असतानाच महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा विचार केला. 2024 मध्ये तिने ‘सूत्रधार’ हा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला केवळ सहा महिलांसोबत सुरू केलेला तिचा हा उपक्रम आता 250 हून अधिक महिलांपर्यंत पोहोचला आहे. विशेषतः ग्रामीण आणि गावातील महिलांना या उपक्रमाचा मोठा फायदा होत आहे. महिलांचा फावल्या वेळेचा सदुपयोग अर्थार्जनात परावर्तित झाला आहे.
कचर्‍याचे ‘अपसायकलिंग’
‘सूत्रधार’चे वैशिष्ट्य म्हणजे येथे वस्त्रोद्योगातील कचर्‍याला कच्चा माल मानले जाते. वस्त्रोद्योगातून उरणार्‍या कापडाच्या कापण्या तथा छोटे-मोठे तुकडे एकत्र करून महिलांपर्यंत पोहोचविले जातात. तसेच त्या महिलांना शिवणकाम, भरतकाम आणि विणकाम यांचे प्रशिक्षण दिले जाते. या कौशल्यांचा वापर करून त्या कापडाच्या तुकड्यांपासून शर्ट आणि इतर दैनंदिन उपयोगी वस्तू तयार करतात. अशा प्रक्रियेला अपसायकलिंग म्हणता येते. म्हणजे टाकाऊ किंवा कमी मूल्याच्या वस्तूचे अधिक उपयोगी आणि मूल्यवान उत्पादनात रूपांतर करणे होय. थोडक्यात, कचर्‍यातून सोने तयार करणे हे उद्दिष्ट यामध्ये आहे.
घरातून रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य
या मॉडेलचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे महिलांना कामासाठी कारखान्यात जाण्याची आवश्यकता नाही. त्या घरातून, तथा घरच्या घरीच आपल्या उपलब्ध वेळेनुसार काही तास काम करू शकतात. त्यामुळे घरगुती जबाबदार्‍या सांभाळत रोजगार करणे शक्य होते. उपलब्ध माहितीनुसार या उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांचे मासिक उत्पन्न साधारण 4,000 ते 25,000 इतके आहे. प्रत्येक महिलेला मिळणारा मोबदला हा उत्पन्न कौशल्य, कामाचे प्रमाण आणि उत्पादनाच्या प्रकारानुसार बदलते.
या उत्पन्नाचा परिणाम केवळ महिलांपुरता मर्यादित राहत नाही. 45 वर्षीय शोभा आपल्या उत्पन्नातून मुलांच्या शिक्षणाला हातभार लावत आहेत. चंदा आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. प्राची स्वतःच्या बी.ए. शिक्षणाचा खर्च भागवत असून भविष्यात फॅशन डिझायनर होण्याचे स्वप्न पाहत आहे. मोनिका आपल्या भावाच्या संगणक प्रशिक्षणासाठी उत्पन्न वापरत आहे. कापडाच्या कापण्या योग्य व्यवस्थापनाशिवाय लँडफिलमध्ये जाऊ शकतात किंवा जलवाहिन्यांमध्ये पोहोचून प्रदूषण वाढवू शकतात. ‘सूत्रधार’ अशा सामग्रीला पुन्हा उत्पादनक्षम बनवतो. त्यामुळे कचरा कमी करणे + कौशल्यविकास + रोजगारनिर्मिती + महिला सक्षमीकरण हे चारही उद्देश एकाच मॉडेलमध्ये साध्य होतात.
अवघ्या सतरा वर्षांच्या विद्यार्थिनीने सहा महिलांपासून सुरू केलेला हा प्रवास 250 हून अधिक महिलांपर्यंत पोहोचला आहे. ‘सूत्रधार’ ही केवळ रोजगाराची कल्पना नाही; ती कचर्‍याचे संसाधनात, कौशल्याचे उत्पन्नात आणि उत्पन्नाचे स्वावलंबनात रूपांतर करणारे सामाजिक-पर्यावरणीय मॉडेल आहे.
भविष्यात अशा स्थानिक, विकेंद्रित आणि कौशल्याधारित उपक्रमांना व्यापक बाजारपेठ व प्रशिक्षणाची जोड मिळाल्यास वस्त्रोद्योगातील कचरा व्यवस्थापनाबरोबरच ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही मोठी चालना मिळू शकते.

Creating employment from textile waste

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

16 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

16 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

17 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

17 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

17 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

17 hours ago