दिवसा उन्हाचा चटका कायम, तर पहाटे आणि रात्री गारवा वाढला
मालेगाव : प्रतिनिधी
शहरात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात चढउतार होत आहे. गेल्या काही दिवसांत किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. दिवसा उन्हाचा चटका कायम असला, तरी पहाटे आणि रात्री हवेत गारवा जाणवू लागला आहे. 1 नोव्हेंबरला 28.4 अंश सेल्सिअस असलेले किमान तापमान 15 नोव्हेंबर रोजी थेट 14 अंशांवर आले आहे. त्यामुळे शहरात हिवाळ्याची चाहूल अधिक तीव्र झाली आहे.
हवामानाच्या नोंदीनुसार, 1 नोव्हेंबरला शहराचे कमाल तापमान 31.8, तर किमान तापमान 28.4 अंश सेल्सिअस होते.
2 नोव्हेंबरला किमान तापमान 22.2 अंशांवर आले. त्यानंतर 4 नोव्हेंबरला कमाल तापमान 33.2 अंशांपर्यंत पोहोचले असतानाच किमान तापमानात 18 अंशांपर्यंत घट झाली. 5 नोव्हेंबरला किमान तापमान 18.4, तर 6 नोव्हेंबरला 16.6 अंश नोंदविण्यात आले.
8 नोव्हेंबरपासून किमान तापमानात आणखी घट होऊन ते 14.2 अंशांवर आले. 9 नोव्हेंबरला 14.4, 12 नोव्हेंबरला 14.6, 13 नोव्हेंबरला 14, 14 नोव्हेंबरला 14.4 आणि 15 नोव्हेंबरला पुन्हा 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अवघ्या पंधरा दिवसांत किमान तापमानात 14.4 अंशांची घट झाल्याने वातावरणातील बदल स्पष्टपणे जाणवू लागला आहे.
विशेष म्हणजे, रात्री आणि पहाटे गारवा वाढत असताना दिवसा मात्र कमाल तापमान 30 ते 33 अंशांच्या दरम्यान राहत आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री उबदार कपड्यांची गरज भासत असून, दुपारी उन्हाचा अनुभव कायम आहे. तापमानातील या फरकामुळे दिवस आणि रात्रीच्या हवामानात तफावत निर्माण झाली आहे.
Onset of winter in Malegaon; temperature at 14 degrees