त्र्यंबकराजाच्या दर्शनाला उसळली गर्दी

अस्वच्छ जागेत उभे राहून भाविक त्रासले

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर मंदिरात शनिवार, रविवारी दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. रविवारी भाविकांना अतितातडीच्या 2500 रुपयांच्या पावती दर्शनाला दोन तास, 200 रुपयांच्या थेट दर्शनाला पाच तास आणि पूर्व दरवाजा मोफत दर्शनबारीत सात तास लागले.
तीन प्रकारच्या दर्शनबारीत असलेली गर्दी आणि अस्वच्छ जागेत उभे राहावे लागल्याने भाविक त्रासलेले आढळून येतात. पूर्व दरवाजा दर्शनबारी नेमकी कोणत्या ठिकाणी सुरू होते तसेच येथे मोफत दर्शनबारी आहे, याची माहिती भाविकांना होत नाही. भाविक वाहनतळावर उतरून तेथून थेट मंदिराकडे येतात. दर्शनी भागात म्हणजेच उत्तर महाद्वाराच्या समोर असलेली गर्दी पाहतात. तेथे 2500 रुपये आणि 200 रुपये दर्शन असल्याचे समजते. साहजिकच भाविक 200 रुपये तिकीट घेण्यासाठी पुन्हा वाहनतळाकडे धाव घेतात.
विशेष म्हणजे, मंदिर परिसरात चालण्याची क्षमता नसलेले अथवा कंटाळा आलेले भाविक तसेच तिकीट खिडकी निश्चित कोठे आह,े याची माहिती होत नसल्याने 100 रुपये प्रतिसीट भाडे देऊन रिक्षाने जातात. तिकीट घेऊन पुन्हा रांगेत उभे राहतात तेव्हा दर्शनासाठी 5 तास लागतील हे समजते. 2500 रुपये अतितातडीच्या दर्शनाची सुविधा निर्माण झाल्याने भाविक दर्शन घेऊन ताबडतोब माघारी परत जाता येईल, या भावनेने 2500 रुपये मोजण्यास तयार होतात. मात्र, त्यासाठीदेखील दोन तास रांगेत थांबावे लागल्याने हे कसे अतितातडीचे दर्शन असे म्हणत येथील व्यवस्थेला नाव ठेवत माघारी फिरतात. देवस्थान ट्रस्ट कार्यालयाच्या इमारतीच्या दरवाजाने म्हणजेच कोठी दरवाजाने तथाकथित व्हीआयपी जातात. त्यांची सर्वांत अगोदर दर्शनासाठी वर्णी लागते. या सर्व घुसखोरीने पूर्व दरवाजा दर्शनबारीतील भाविक मंदिर प्रांगणात येऊनदेखील तास-दोन तास थांबून राहतात. यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना एकाच ठिकाणाहून प्रवेश देण्यात यावा. प्रत्येक रांगेचे प्रवेशद्वार शेजारी शेजारी असावे म्हणजे भाविकांचा गोंधळ निर्माण होऊन फसगत टळेल तसेच पारदर्शकतादेखील राहील, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

भाविकांची फसवणूक

2500 रुपये देणगी पावती घेऊन अतितातडीच्या दर्शनासाठी दोन तास थांबावे लागते ही भाविकांची फसवणूक नाही का? असा प्रश्न भाविक विचारत असल्याचे आढळते. तसेच 2500 रुपये रोख स्वरूपात द्यावे लागतात. एका वेळेस चार व्यक्ती असतील तर 10 हजार रुपये रोख स्वरुपात असतील याची शक्यता नसते. अनेकदा भाविक एटीएम शोधतात. विशेष म्हणजे, मंदिर परिसरात एटीएम सुविधा नसल्याने भाविकांची पंचायत होते तर एटीएमपर्यंत पोहोचलेले भाविक सेवा बंद असल्याचे पाहून निराश होतात.

Crowds surge to seek blessings of Lord Trimbakraj.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *