दरात दहा ते वीस टक्क्यांची वाढ
लासलगाव : वार्ताहर
वाढत्या उष्णतेमुळे नैसर्गिक पद्धतीने पाणी थंड ठेवणार्या मातीच्या माठांची मागणी बाजारात प्रचंड वाढली आहे. आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक असल्याने तसेच गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणार्या या माठांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत
आहे.
गेल्या काही दिवसांपासून लासलगाव व परिसरात उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. गरिबाचा ‘फ्रीज’ म्हणून ओळखल्या जाणार्या मातीचे माठ लासलगाव शहरात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. शहरातील मेन रोड तसेच आठवडे बाजार भरणार्या बाजारतळ या ठिकाणी कुंभार बांधवांकडून माठ विक्रीची दुकाने थाटली आहेत.
यंदा माठासाठी लागणार्या कच्च्या मालाच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाल्याने यंदा माठाच्या दरात दहा ते वीस टक्क्यांची वाढ झाल्याचे वेळापूर येथील कुंभार जालिंदर भागवत यांनी सांगितले. होळीनंतर माठांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते.कुंभार व्यावसायिक वर्षभर मेहनत घेऊन माठ बनविण्यासाठी मग्न असतात.
Customers prefer Mathas due to rising heat