नाशिक

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला

नाशिक ः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी (दि. 28) सकाळी विमान दुर्घटनेत निधन झाले. पवार यांच्या अकाली एक्झिटचे वृत्त माध्यमांद्वारे समजताच नाशिक शहर व जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

दरम्यान, अजित पवार यांचे नाशिक जिल्ह्यावर विशेष प्रेम होते. या प्रेमापोटीच त्यांनी एकाच जिल्ह्यात तीन-तीन मंत्रिपदे पक्षातील नेत्यांना बहाल केली. त्यांच्या निधनाची बातमी नाशकात सकाळी समजताच शहर व जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार आदींसह सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्यासमवेतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जड अंतःकरणाने दादांना श्रद्धांजली वाहिली. अजितदादा एका पक्षाचे प्रमुख असले, तरी त्यांना पक्षापलीकडेही मानणारा मोठा वर्ग होता. यात इतर पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे. अजितदादांचा स्पष्टवक्तेपणा हा अगदी सामान्य माणसाला आवडणारा होता. अजितदादांच्या निधनावर शहर-जिल्ह्यातील नेत्यांनी वाहिलेली श्रद्धांजली…

विश्वास बसत नाही
अजितदादांच्या निधनाचेे वास्तव स्वीकारण्याची कठीण वेळ आज आपल्यावर आली आहे. व्यक्तिगत मला स्वतःलाही यातून सावरणं खूप कठीण जाणार आहे. कडक शिस्तीचे प्रशासक अशी ओळख असलेल्या अजितदादांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तब्बल 11 वेळा मांडला असून, ते महाराष्ट्राचे दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरले. अजितदादांशी माझे ऋणानुबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या आधीपासून आहेत. शरद पवार साहेबांप्रमाणेच महाराष्ट्रातील जनतेची नस ओळखणारा आणि सर्वसामान्यांशी जोडला गेलेला जमिनीवरील नेता, अशी त्यांची ओळख होती. दादांनी मला आणि आमच्या भुजबळ कुटुंबाला दिलेलं प्रेम कायम स्मरणात राहील. अजितदादा यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना! दादा, हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही.
– छगन भुजबळ, मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलखुलास व्यक्तिमत्त्व हरपले
दादांचे अपघाती निधन ही आपल्यासाठी वेदना देणारी घटना आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. सदैव वेळ पाळणारे दादा आज वेळेआधीच आपल्यातून निघून गेले. ही घटना मनाला सुन्न करणारी आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी माझी आणि दादांची एका विषयावर चर्चा होत असताना अतिशय दिलखुलासपणे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली, तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. दादांवर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे अतूट प्रेम होते. त्याचबरोबर सर्व पक्षांतील नेते व कार्यकर्ते दादांचा आदर करत होते. नाशिक जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीने, शिक्षण विभागातील विद्यार्थी, पालक, अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने दादांना भावपूणर्र् श्रद्धांजली.
– दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री

खरंतर राजकारणात स्पष्ट बोलणारी माणसं आढळत नाहीत; परंतु अजितदादा यास अपवाद होते. प्रशासनावर कमालीची पकड. एक दिलदार व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती. त्यांच्या निधनाने पक्षाचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान आहे. असा नेता घडण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो.
– अजय बोरस्ते, उपनेते, शिंदेसेना

खर्‍या अर्थाने महाराष्ट्राची जाण असलेला व सहकार क्षेत्रातली इत्यंभूत माहिती असलेला नेता हरपला आहे. अजितदादांच्या जाण्याने आम्हा शिवसैनिकांनाही मोठा धक्का बसला आहे. जड अंतःकरणाने आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
– दत्ता गायकवाड, उपनेते, शिवसेना उबाठा

काय बोलू, शब्दच नाहीयेत. एखादे वाईट स्वप्न पाहत आहोत की, काय? इतकी दुर्दैवी घटना आमच्यासाठी आहे. दादांना श्रद्धांजली वाहणे हा विचारही करवत नाही.
– रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पोकळी निर्माण झाली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. ही अत्यंत दुःखद घटना आहे. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सीटू) त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. तसेच त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त करते. अजित पवार अत्यंत कार्यक्षम मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राच्या अर्थकारण व राजकारणावर मोठी छाप सोडली होती. त्यांची प्रशासनावर मजबूत पकड होती. राज्यातील जनतेचा त्यांच्यावर मोठा विश्वास होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
– डॉ. डी. एल. कराड, राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष, सीटू

सच्च्या मनाचा राजकारणी गमावला
महाराष्ट्राच्या राजकारणातील स्पष्टवक्ता, सुसंस्कृत राजकारणी, हजरजबाबी, राज्याला लाभलेला अनमोल कोहिनूर हरपल्याचे अतीव दु:ख आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना त्यांना एका कामाच्या निमित्ताने सुरुवातीला भेटण्याचा प्रसंग आला होता, पण दादांना भेटल्यावर त्यांनी केलेली विचारपूस आणि कामाप्रति घेतलेली माहिती, त्यातून आपुलकीची जाणीव, तसेच रोखठोक उत्तर मला आजही आठवतंय. असा सच्च्या मनाचा राजकारणी होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादा!
– ज्ञानेश्वर काळे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी
अनुसूचित जाती विभाग

नेतृत्वाने महाराष्ट्राला दिशा मिळाली
नामदार अजित पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात राज्याच्या विकासासाठी, विशेषतः उद्योग, पायाभूत सुविधा आणि रोजगारनिर्मिती क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला दिशा मिळाली आहे. या कठीण प्रसंगी ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना, सहकार्‍यांना व समर्थकांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना. – आशिष नहार, अध्यक्ष, निमा

Dada’s premature exit! The district is in mourning.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

2 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

3 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

3 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

3 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

3 hours ago

सिन्नरला बाजारपेठेत कडकडीत बंद

सिन्नरकर शोकसागरात सिन्नर : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी समजताच सिन्नर शहरात शोककळा…

4 hours ago