नद्यांचे महत्त्व नव्याने सांगायची गरज नाही. अनादि काळापासून मानवाने आपली वसाहत नद्यांच्या तीरावरच बसवली होती. नद्या या मानवासाठी आणि इतर सजीवांसाठी जीवनदायिनी आहेत; परंतु मानवाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे नद्यांची अवस्था अत्यंत गंभीर झालेली आहे. अनेक नद्या मानवानेच प्रदूषित केल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे मानवाची वाढती लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येसाठी पाण्याची वाढती गरज. आणि मानवाने निसर्गावर केलेले अतिक्रमण!
देशातीलच नव्हे, तर जगातील अनेक नद्या कमालीच्या प्रदूषित झाल्या आहेत. नद्यांच्या तीरावर वसलेल्या शहरांमुळे शहरातील मलमूत्र, सांडपाणी आणि अनेक टाकाऊ प्रदूषणकारी घटक यांची विल्हेवाट आजही नदीपात्रातच केली जाते. त्यामुळे नद्यांना ओंगळ स्वरूप प्राप्त झाले आहे. नद्या या निसर्गतः स्वयंशुद्धीकरण करीत असतात; परंतु प्रदूषित घटकांचा एवढा प्रचंड मारा असतो की, त्या पाण्याचे शुद्धीकरण नैसर्गिकरीत्या होत नाही. त्यामुळेच भारतातील अनेक नद्यांना गटारीचे ओंगळ स्वरूप आलेले आहे. त्यात गंगा, गोदावरी, यमुना, कावेरी, मुळा मुठा व पवना यांसारख्या अनेक नद्यांचा समावेश होतो. अनेकदा विषारी घटकांमुळे नद्यांमधील मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटते. जलचर जीवांचा गुदमरून मृत्यू होतो. प्रदूषणकारक घटकांमुळे जलपर्णी व विविध प्रकारची शेवाळे नदीपात्रात वाढतात.
अलीकडील एका नव्या वैज्ञानिक अभ्यासानुसार जगातील जवळपास 80% नद्यांमधील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. यामुळे मासे, जलचर जीवसृष्टी आणि संपूर्ण गोड्या पाण्याच्या परिसंस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.अभ्यासात 1985 ते 2023 या कालावधातील 21,000 हून अधिक नदीप्रवाहांचे विश्लेषण करण्यात आले. संशोधकांनी उपग्रह माहिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ते(एआय)चा वापर करून नदीतील ऑक्सिजन पातळीतील बदलांचा अभ्यास केला. त्यातून असे दिसून आले की, सरासरी प्रत्येक दशकात नद्यांमधील ऑक्सिजन 0.045 % ने घटत आहे.
आपल्या देशातील अनेक नद्यांच्या तीरावर धार्मिक तीर्थस्थळे आहेत. अशा तीर्थक्षेत्री लाखो, कोट्यावधी लोक पुण्य मिळावे या भावनेने येतात आणि नदीपात्रात पवित्र स्नान करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनेक ठिकाणी कुंभमेळे भरविले जातात. नाशिक कुंभमेळ्यासाठीदेखील कोट्यवधी लोक येतील असा अंदाज आहे. त्यामुळे गोदावरीची अवस्था काय होईल, याची कल्पनाच केलेली बरी! त्यामुळे नद्यांची अवस्था अधिक बिकट होते फार मोठ्या प्रमाणात तेथे प्रदूषण होते. या घटेचे सर्वांत मोठे कारण हवामान बदल असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे नदीचे पाणी उष्ण होत आहे आणि उष्ण पाण्यात ऑक्सिजन कमी प्रमाणात विरघळतो. संशोधकांच्या मते जागतिक नदी-ऑक्सिजन घटेपैकी सुमारे 63% हिस्सा हवामान बदलामुळे आहे.
विशेष म्हणजे, उष्ण कटिबंधातील नद्या सर्वाधिक धोक्यात आहेत. भारतातील गंगा नदी आणि दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदी, या नद्यांमध्ये ऑक्सिजन घट अत्यंत वेगाने होत असल्याचे दिसून आले. गंगा नदीतील ऑक्सिजन घट जागतिक सरासरीपेक्षा सुमारे वीसपट वेगाने होत असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.
नद्यांमधील ऑक्सिजन कमी झाल्यास ‘डेड झोन’ तयार होऊ शकतात. अशा भागांमध्ये मासे आणि इतर जलचरांना श्वास घेणे कठीण होते आणि मोठ्या प्रमाणावर जीवसृष्टी नष्ट होऊ शकते. वैज्ञानिकांच्या मते यामुळे जैवविविधतेत घट, पाण्याच्या गुणवत्तेचे नुकसान आणि मत्स्यसंपत्तीवर परिणाम होऊ शकतो.
उष्णतेच्या लाटा, प्रचंड मोठी धरणे, कमी पाण्याचा प्रवाह आणि प्रदूषण हीसुद्धा ऑक्सिजन घट वाढवणारी महत्त्वाची कारणे आहेत. विशेषतः सेंद्रिय कचरा, खतांमधील रसायने आणि औद्योगिक प्रदूषणामुळे पाण्यातील ऑक्सिजन अधिक वेगाने कमी होतो. वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, जर हीच परिस्थिती कायम राहिली तर शतकाच्या अखेरीस जगातील नद्यांमधील ऑक्सिजन आणखी 45% ने कमी होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात अनेक नदी परिसंस्था गंभीर संकटात सापडू शकतात. आणि ते मानव जातीसाठी आणि सजीव सृष्टीसाठी मोठे संकट असेल. म्हणून आपणच सगळ्यांनी शहाणे होऊन नदी प्रदूषण कसे टाळता येईल याची खबरदारी घेतली पाहिजे. अन्यथा निसर्ग आपल्याला माफ करणार नाही. शासकीय पातळीवर घेतलेले निर्णय यशस्वी होत नाहीत.
Decrease in oxygen in rivers