पंकज पाटील
अबला म्हणून दुर्लक्षित केल्या गेलेली अशीच एक महान विभूती म्हणजे अहिल्याबाई होळकर. एक स्त्री, गृहिणी, माता, शासनकर्ती या विविध भूमिका वठवितांना निर्विवादपणे अव्वल स्थान प्राप्त करणार्या अहिल्याबाई होळकरांना प्रजेने आई म्हणून हाक मारावी, त्या अशा श्रेष्ठतम मातृत्वाला व शेवटी देवतेच्या पदाला कशा पोहोचल्या? हे पाहून अंगिकारण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या सर्वांचे जीवन उजळून निघेल.
अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला, त्यांचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा, खंडेरावांशी झाले. ’तमसो मा ज्योतिर्गमय’ हा मंत्र त्यांच्या रोमारोमात भिनला होता. नैराश्यांधकारातून त्यांनी स्वतःच्या धीरोदत्त वागण्यानं, शंभू महादेवाचे व्रत अंगीकारून ईश्वरावरील अटल श्रद्धेच्या पायावर आपल्या जीवनाची उभी इमारत उभी करण्याची गाठ हृदयाशी बांधली होती.
शेवटपर्यंत दुर्वर्तनी पती पुत्र यांना सुधरवायचा प्रयत्न करीत, कुलस्वामी मल्हारी मार्तंडाला पदर पसरून प्रार्थना करीत. त्यांची दृढ श्रद्धा, गंभीर उदात्त वागण्यामुळे व चुकीच्या कामासाठी प्रसंगी खडसावण्यामुळे पती खंडेरावांना त्यांचा वचक वाटे. त्यांना मालेराव व मुक्ताबाई ही दोन अपत्ये होती.दुर्दैवाने कुंभेरीच्या युद्धात, त्यांचे पती खंडेराव धारातीर्थी पतन पावले. 29 व्या पती वियोगाने दु:खी अहिल्याबाई सती जाण्यास निघाल्या. पुत्रवियोगानं विव्हळ झालेल्या बाणेदार सुभेदार मल्हाररावांनी सुनेला सती न जाण्याच्या केलेल्या विनावणीचा मान राखत अहिल्याबाईं घरात परतल्या. आता जीवनात पुढे महान ध्येय होतं. जनकल्याणार्थ हलाहल पिणार्या, शुभ करोति स: शंकर: अशा शंभू महादेवाचा जनकल्याणार्थ जीवन वसा घेतला. ह्या राजयोगिनीची वेशभूषा बिनकाठांचं शुभ्र पातळ हे परिधान, गळ्यात रुद्राक्षांची माळ व सतत जनकल्याणाचं स्मरण देणारी मृत्युंजयाची पिंडी हातात हीच होती. अत्यंत कुशलतेनं कर्तुत्ववान सासर्याच्या हाताखाली राजकाजात, युद्धविद्येत तयार झालेल्या कर्तुत्ववान अहिल्याबाईंनी फारच कुशलतेने राज्यकारभार चालवला.
1766 ला सुभेदार मल्हाररावांचे निधन झाले. दैवानं देवी अहिल्याबाईंच्या पाठीवरचा मार्गदर्शनाचा, धीराचा, मायेचा हातही हिरावून घेतला. आज ना उद्या होळकर राज्याचा एकमेव वारस मालेराव सुधरेल, राज्याचा योग्य सांभाळ करील या स्वार्थी कल्पनेनं नव्हे तर राज्य उघडे पडू नये, अराजकता माजू नये म्हणून ’मुली राज्यकरता मालेरावला सांभाळ तो सुधारेल’ या सासर्याच्या आदेशाचे पालन करण्याचे वचन दिल्याप्रमाणे या न्यायनिष्ट माऊलीने मालरावच्या कितीतरी अपराधांना क्षमा केली. पण मुलाचा कड घेऊन प्रजेवर कधीही अन्याय होऊ दिला नाही. मालेरावात काहीच सुधार झाला नाही. विक्षिप्तपणा, अनन्वित क्रूर कृत्य, भ्रष्ट चरित्र पाहून प्रजावत्सल माऊलींचे अंत:करण जळत होतं. सुभेदार मल्हाररावांनंतर वर्षाच्या आतच 1767 मध्ये मालेरावांचा मृत्यू झाला. त्यावेळी ’जनता माले रावांच्या जाचातून मुक्त झाली’ असे उत्स्फूर्त उद्गार पददलितांच्या सेवारत अहिल्यामाताच काढू शकतात. मालेरावांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराच्या प्रथमदिनी, भर दरबारात राज कोषावर त्यांनी तुळशीपत्र ठेवलेले पाहून सर्वांनी तोंडात बोटे घातली. त्यांनी राजकोषातून, सार्वजनिक मालकीच्या पैशातून, एक कपर्दिकहि दानधर्मा करिता वा स्वतःच्या खाजगी व्यवहारा करता खर्च केला नाही. ’जनतेचा पैसा जनतेच्या करताच’ हे त्यांचे शेवटपर्यंत चे ब्रीद होते.
व्यवहारात-हिशोबात खोट आढळल्यास त्याच्या पाच पट रक्कम देईल असं आत्मविश्वासाने सांगत पारदर्शक आर्थिक व्यवहार करण्यार्या अहिल्याबाईंचा आदर्श राज्यकर्त्यांनी घ्यावा. पति व पुत्र निधनानंतर एक बाई काय राज्यकारभार करू शकेल? ह्या कल्पनेने आसपासची राज्य गिळंकृत करण्याची इच्छा करणारी बरीच राज्यकर्ते प्रयत्नशील होती. इतकेच नव्हे तर काकदृष्टीच्या जुन्या कारभारी, गंगोबा तात्यांनी आपला मुलगा दत्तक देऊन राज्य हाताळण्याचा आटोकाट प्रयत्न कपटनीतीने केला, पण अहिल्याबाईंनी त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवला. त्यांनी राजसिंहासनाला उपभोगाचं सिंहासन कधीच मानले नाही. ते सेवेचं, जनकल्याणाचं आसन आहे हेच त्यांनी शेवटपर्यंत मनात त्यांच्या या गुणांमुळे त्या दीनांच्या आई झाल्या लोक त्यांना अहिल्यामाता संबोधू लागले.
हे ही वाचा :
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…