संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे आज प्रस्थान

त्र्यंबकनगरी सज्ज; कुंभमेळ्याच्या कामांमुळे पालखी मार्गात बदल

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याचे आज, सोमवारी (दि. 29) दुपारी दोनला पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, सकाळी 11 वाजता समाधी मंदिर सभामंडपात नारळ प्रसाद वाटप होईल. त्यानंतर भोजन होऊन दुपारी पारंपरिक पद्धतीने पालखी मार्गस्थ होईल. पालखीचा पहिला मुक्काम अवघ्या दोन किलोमीटरवरील पेगलवाडी फाटा येथील महानिर्वाणी आखाड्याच्या जागेत असल्याने, गेल्या काही वर्षांपासून प्रस्थान सकाळऐवजी दुपारी 2 वाजता करण्याचा प्रघात पडला आहे.
यंदा सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने पालखी मार्गात काहीसा बदल केला आहे. संजीवन समाधी मंदिरातून प्रस्थान झाल्यानंतर पालखी रथ संत जनार्दन स्वामी मठाच्या बाजूने, सुंदराबाई मठ रस्त्याने तेली गल्लीमार्गे कुशावर्त तीर्थावर येईल. तेथे महापूजा झाल्यानंतर मेनरोडने पारंपरिक मार्गाने त्र्यंबकेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि पुढे गावाबाहेर मार्गक्रमण करेल.

भेटीची वेळ महत्त्वाची
सोमवार असल्याने भगवान त्र्यंबकराजाची पालखी दुपारी 3.45 वाजता कुशावर्ताकडे जाईल व 5 वाजता मंदिरात परतेल. तत्पूर्वी, संत निवृत्तिनाथांची पालखी दुपारी 2.30 वाजता कुशावर्तावर येऊन, महापूजा आटोपून साडेतीन वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भेटीसाठी पोहोचणे आवश्यक ठरणार आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये वारकर्‍यांची गर्दी
पालखी सोहळ्यासाठी रविवारी दुपारपासूनच वारकरी शहरात दाखल झाले आहेत. पहिल्या मुक्कामाच्या अंतरामुळे आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थ प्रस्थानाच्या दिवशी हजेरी लावून पेगलवाडी फाट्यापर्यंत सोबत चालतात. दरम्यान, शहरात दाखल झालेल्या भाविकांना गल्लीबोळातून रस्ता शोधावा लागला, तर काहींना खोदलेल्या रस्त्यांच्या कडेनेच मंदिराकडे जावे लागले.

प्रशासकीय यंत्रणा सज्ज
पालखी मार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी मुख्याधिकारी गोविंद जाधव, शहर अभियंता स्वप्नील काकड व त्यांच्या सहकार्‍यांनी सुटीच्या दिवशीही तळ ठोकला होता. वारकर्‍यांचा प्रवास सुकर व्हावा म्हणून प्रशासनाची धावपळ सुरू होती. माजी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, दीपिका पाटणकर, प्रशांत गायधनी, विष्णू दोबाडे आदींसह लोकप्रतिनिधींनी पालखी मार्गाची पाहणी करून अडचणी दूर करण्यासाठी परिश्रम घेतले.

 

Departure of the Sant Nivruttinath Maharaj Palkhi Today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *