खा. वाजे संसदेत गरजले, केंद्राकडे ठोस कारवाईची मागणी
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकसह देशातील प्रमुख शहरांमध्ये वाढत चाललेल्या ड्रग्ज सिंडिकेटच्या धोक्याचा मुद्दा खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत जोरदार मांडला. नाशिकमधील ड्रग्जचे सिंडिकेट उद्ध्वस्त करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. मागील काही महिन्यांत नाशिकमध्ये आंतरराज्य पातळीवरील टोळ्या तरुण पिढीला उद्ध्वस्त करत असल्याचे सांगत खा. वाजे यांनी संसदेत भूमिका मांडताना लक्ष वेधले.
तरुण पिढीला लक्ष्य करणारी मेफेड्रॉन आणि सिंथेटिक ड्रग्जची घातक साखळी या परिस्थितीबद्दल खा. वाजे संसदेत बोलले. युवकांना वाचवण्यासाठी तातडीच्या कारवाईची आवश्यकता असल्याचे खासदार वाजे यांनी म्हटले आहे.खा. राजाभाऊ वाजे म्हणाले की, नाशिकसारख्या सांस्कृतिक आणि औद्योगिक शहरात ड्रग्जची लागण वेगाने वाढत आहे. युवकांना या सर्वनाशक चक्रातून बाहेर काढण्यासाठी केंद्राने तत्काळ, व्यापक आणि बहुआयामी कारवाई करणे अत्यावश्यक आहे. केवळ कायद्याची अंमलबजावणी नव्हे तर जनजागृती, शैक्षणिक पातळीवर प्रतिबंधात्मक मोहिमा, पुनर्वसन व्यवस्था बळकट करणे, यांची केंद्र सरकारकडून विशेष मागणी केली. नाशिकमध्ये वाढत चाललेल्या ड्रग्ज समस्येचे गांभीर्य पाहता खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत दिलेला संदेश हा समाज, प्रशासन आणि सरकारसाठी वेळेवर दिलेला इशारा आहे. ही समस्या केवळ कायद्याची नसून, सामाजिक, मानसिक आणि कौटुंबिक परिणाम करणारी व्यापक आपत्ती असून, तिच्यावर निर्णायक युद्ध छेडणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खा. वाजेंनी सुचवल्या उपाययोजना
♦ पोलिस, स्थानिक यंत्रणा यांचा मजबूत संयुक्त कारवाई आराखडा तयार करणे. ♦ शाळा-महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्ती जनजागृतीचे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम.
♦ ड्रग्जच्या आहारी गेलेल्या युवकांसाठी पुनर्वसन व कौटुंबिक सहाय्य केंद्रांची उपलब्धता वाढवणे.
♦ आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेटचा डिजिटल, आर्थिक व पुरवठा साखळीवर आधारित मागोवा घेण्यासाठी विशेष पथक उभारणे.
ड्रग्जच्या सिंडिकेटमध्ये महिलांचा सहभाग
नाशिकसह महाराष्ट्रातील शहरांमध्ये सुव्यवस्थित ड्रग्ज सिंडिकेट्स असून, त्यात महिलांची सक्रिय भूमिका असून, यात आंतरराज्य गटांचे मोठे नेटवर्क आढळत आहे. या टोळ्यांमुळे युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. यामुळे कुटुंबांमध्येही गंभीर सामाजिक-मानसिक परिणाम पाहायला मिळत आहेत. दोन वर्षांत महाराष्ट्रात लाखो किलो ड्रग्ज जप्ती, दोषी ठरविलेले गुन्हेगार परिस्थिती संकटाची गंभीरता स्पष्ट करते. याकरिता एनसीबी व पोलिस यंत्रणांची संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे.
ड्रग्जचा नाशिकवर थेट परिणाम
गतवर्षी गुजरात एटीएसने भिवंडीमध्ये नोंदविलेल्या मेफेड्रॉनच्या तब्बल 790 किलोहून अधिक जप्ती ही घटना संपूर्ण देशाला हादरवणारी होती. या प्रकारच्या सिंडिकेटचे परिणाम नाशिकपर्यंत पोहचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युवकांना लक्ष्य करणार्या या नेटवर्कमुळे शहरातील शाळा, महाविद्यालय परिसर, औद्योगिक वसाहती, बाह्यगावांमध्ये ड्रग्जचे नवे मार्ग सक्रिय झाल्याची चिंताही त्यांनी
व्यक्त केली.
सध्या माध्यमात ड्रग्ज हा विषय काहीसा मागे पडला असला, तरीपण याकडे लक्ष दिल्यास नाशिकसह देशातील असंख्य शहरांना किंबहुना ग्रामीण भागातही काही प्रमाणात ड्रग्जने विळखा घातला आहे. एक अख्खी पिढी यातून उद्ध्वस्त होत आहे. हे देशावर आलेलं संकट समजून देशव्यापी ठोस उपाययोजना व्हाव्यात.
– राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक