एक रुपयात लागणार सर्वधर्मीय 21 जोडप्यांचा सामुदायिक विवाह

सम्राट वर्मांकडून 22 ला आयोजन; अभिनेता तुषार कपूरची उपस्थिती

येवला : प्रतिनिधी
परिस्थितीअभावी अनेकांसमोर मुला-मुलींचे लग्न करण्यासाठी संकटे उभी असतात. अशा परिस्थितीत आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकी जपत अशा गरजूंना मदतीचा हात पुढे केला जातो. येवला येथील सम्राट वर्मा ग्रुपकडून अवघ्या एक रुपयात 21 जोडप्यांचे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या माध्यमातून समाजसेवेचा नवा वारसा येथे जपला जात आहे. कृष्णा एन्झोटेक कंपनीचे संचालक सम्राट वर्मा यांनी या विवाह सोहळ्यासंदर्भात रविवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत माहिती दिली.
कंपनीच्या संचालिका मीनल वर्मा यांच्या जन्मदिनानिमित 22 डिसेंबर रोजी येवला तालुक्यातील एरंडगाव येथील वर्मा लॉन्समध्ये सर्वधर्मीय 21 जोडप्यांचा विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्याला हिंदी चित्रपट अभिनेते तुषार कपूर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. आपण इतरांसाठी आधार देऊ शकतो, काहीतरी समाजकार्य उभे करू शकतो, या हेतूने सामाजिक बांधिलकी जपत सम्राट वर्मा ग्रुपने सामुदायिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यातील जोडप्यांना साधू-संतांचे आशीर्वाद लाभणार आहेत. 21 जोडप्यांच्या विवाहाचे नियोजन केले असले, तरी यापेक्षा अधिक जोडप्यांनी सहभाग घेतला, तरी त्यांना संधी दिली जाणार आहे. सर्व जोडप्यांना वर्मा यांच्याकडून मणी- मंगळसूत्र व संसारोपयोगी भेटवस्तू देण्यात येणार आहे. विवाहासाठी डीजे, बँड, पुष्पहार, पुष्पगुच्छ, विवाह मंडप आदी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. 15 डिसेंबरपर्यंत प्रथम आलेल्या 21 जोडप्यांची एक रुपयात नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी वधूचे वय 18 वर्षे व वराचे 21 वर्षे वय पूर्ण असल्याचा वयाचा दाखला, वधू -वराचे डोमासाइल प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, आई-वडिलांच्या रहिवासी दाखला, वधू-वराचे प्रत्येकी दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, आधारकार्ड, पॅनकार्ड, सक्षम अधिकार्‍यांच्या सही आणि शिक्का असलेले जात प्रमाणपत्र व विवाह नोंदणीसाठी आई- वडील व एक साक्षीदार उपस्थित असणे आवश्यक आहे. विवाहाचे निमंत्रक सम्राट वर्मा ग्रुपचे संस्थापक व वर्मा ग्रुपचे सदस्य आहेत. विवाह नोंदणीसाठी ग्रुपने आवाहन केले आहे.

सामाजिक, ऐतिहासिक व प्रेरणादायी असा उपक्रम येवल्यामध्ये प्रथमच होत आहे. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातून वेळ, श्रम व आर्थिक बचत व्हावी, याच हेतूने सोहळ्याचे आयोजन आम्ही केले आहे. सामाजिक बांधिलकी जपताना काही सर्वसामान्य कुटुंबीयांसाठी असे सोहळे गरजेचे ठरतील. सर्व स्तरांतील कुटुंबीयदेखील यात सहभागी होऊ शकतील. इच्छुकांनी 15 डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करावी.
– सम्राट वर्मा, संस्थापक, सम्राट वर्मा ग्रुप, येवला

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *