आस्वाद

विकास की विनाश?

भारतीय धर्मपरंपरेत वृक्षांना केवळ जैविक घटक म्हणून पाहिले गेलेले नाही, तर त्यांना आध्यात्मिक आणि दैवी स्थान दिले गेले आहे. भगवद्गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, अश्वत्थः सर्ववृक्षाणां (अध्याय 10, श्लोक 26) म्हणजेच सर्व वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे. हा श्लोक केवळ एक उपमा नसून, तो वृक्षांमध्ये असलेल्या दैवीशक्तीची जाणीव करून देतो. वृक्ष म्हणजे ईश्वराचेच एक रूप आहे, अशी भावना आपल्या संस्कृतीने रुजवली आहे. हीच भावना संत तुकाराम महाराजांनी अत्यंत सुंदर शब्दांत व्यक्त केली आहे…
वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें।
पक्षीही सुस्वरें आळविती ॥1॥
याद्वारे संतशिरोमणी संत तुकाराम महाराज म्हणतात झाडे-वेली (वनचरे) हे आपले नातेवाईकच आहे, असे सांगून मानव आणि निसर्ग यांच्यातील नात्याची गूढता आणि आपुलकी स्पष्ट करतात. निसर्गाशी असलेले हे नाते केवळ उपयोगितेवर आधारित नसून, ते प्रेम, सहजीवन आणि कृतज्ञतेवर आधारलेले आहे. ते सुस्वरात देवाचे नामस्मरण करतात, ज्यामुळे मनाला एकांतात शांतता आणि आनंद मिळतो. निसर्गाचा निःस्वार्थ भावः मानवी नात्यात स्वार्थ, राग, लोभ असू शकतो; परंतु वृक्ष निःस्वार्थपणे सर्वांना आधार देतात. त्यांच्या सहवासात मन शांत होते आणि अहंकार दूर होतो. हा अभंग आपल्याला झाडे, वेली आणि वन्यजीवांचे महत्त्व पटवून देतो.आजच्या वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गाचा र्‍हास होत असताना, हा अभंग वृक्षलागवड आणि संगोपनाची प्रेरणा देतो. आज होणारी वृक्षतोड ही केवळ पर्यावरणीय हानी नसून, ती आपल्या कुटुंबालाच झालेली इजा आहे. संत चोखामेळासुद्धा चांगुलपणाचे उदाहरण देताना म्हणतात की, ऊस डोंगा परि रस नाही डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा ॥ भारतीय सनातन संस्कृतीत झाडांमध्ये देव असल्याने त्यांना अत्यंत पवित्र व ऊर्जा केंद्र मानले जाते. जसे की, वटवृक्ष म्हणजे देववृक्ष.पिंपळाच्या मुळाशी ब्रह्मा, खोडात विष्णू आणि पानांवर शिव वास करतात. शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. भगवान कृष्णाने स्वतःला वृक्षांमध्ये पिंपळ म्हटले आहे. तुळशीला वारकरी सांप्रदायात असलेले महत्त्व सर्वश्रुत आहे. तुळशीच्या रूपात लक्ष्मी आणि विष्णूचा वास, घरात सुख-समृद्धीसाठी पूजनीय आहे.
बेलपत्र त्रिमूर्ती (तीन पाने) स्वरूपात शिवपूजेसाठी अत्यंत प्रिय आहे. शमीवृक्ष शनिदेव आणि भगवान गणेश यांचे आवडते. यांसारख्या झाडांची पूजा करणे, त्यांना पाणी घालणे आणि दीप लावणे हे सौभाग्य, सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त करण्याचे आणि आध्यात्मिक पुण्य मिळवण्याचे मार्ग मानले जातात. दुर्गा सप्तशतीमध्येसुद्धा…
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ असे सांगितले आहे. आदिशक्ती आईस्वरूप माता भगवती ही सर्व जीवांमध्ये वसलेली आहे. या सर्वभूतांमध्ये वृक्षांचाही समावेश होतो. त्यामुळे प्रत्येक वृक्षात देवीचा अंश आहे, अशी भावना या ग्रंथातून स्पष्ट होते. झाड तोडणे म्हणजे त्या दैवीशक्तीचा अपमान करणे होय. याच धाग्यावर गुरुचरित्रात औदुंबर, वटवृक्ष यांसारख्या वृक्षांना पवित्र मानले गेले आहे. साधना, ध्यान आणि उपासना यासाठी वृक्षाखाली बसण्याची परंपरा ही निसर्गाशी असलेल्या आध्यात्मिक नात्याचीच साक्ष देते. दासबोधमध्ये समर्थ रामदासांनी सृष्टीचे रक्षण आणि संयमित जीवन यावर भर दिला आहे. संसाधनांचा अतिरेक टाळणे आणि निसर्गाशी संतुलन राखणे, हेच खरे कर्तव्य असल्याचे ते सुचवतात. संत कबीर यांच्या ‘पाति पाति में राम है’ या दोह्यात प्रत्येक पानातही परमेश्वर वसतो, अशी भावना व्यक्त होते. संत सावता माळी यांनी कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी। म्हणत शेती आणि वृक्ष यांनाच भक्तीचे माध्यम मानले, तर संत गोरोबाकाका यांनी मातीशी आणि निसर्गाशी एकरूप होऊन जीवन जगण्याचा आदर्श ठेवला. या सर्व संतपरंपरेत व सनातन परंपरेत निसर्गपूजा ही केवळ विधी नसून, ती जीवनपद्धती आहे. याशिवाय
आयुर्वेदात वनस्पतींना औषधी आणि जीवनदायी शक्ती म्हणून गौरवले आहे. पृथ्वी, वनस्पती आणि जल यांचे रक्षण करणे हे मानवाचे कर्तव्य असल्याचे स्पष्टपणे सांगितले गेले आहे. रामायणात प्रभू रामांनी तर सध्या वृक्षतोड होत असलेल्या पंचवटी, तपोवन परिसरातच वनवासात असताना निसर्गाशी एकरूप जीवन जगले, तर महाभारतातही वनांचे आणि वृक्षांचे महत्त्व अनेक ठिकाणी अधोरेखित केले गेले आहे.
अशा या समृद्ध परंपरेच्या पाश्वर्र्भूमीवर नाशिकमधील वृक्षतोडीची घटना अधिकच वेदनादायी वाटते. कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून, तो अध्यात्म, संस्कृती आणि निसर्ग यांचा संगम आहे. जर या सोहळ्याच्या तयारीतच आपण निसर्गाचा विनाश करत असू, तर तो आपल्या धर्माच्या मूलभूत तत्त्वांनाच विरोध करणारा आहे. विकास आवश्यक आहे, यात शंका नाही; परंतु तो विकास निसर्गाचा बळी घेऊन होत असेल, तर तो खरा विकास म्हणता येणार नाही. कारण जेव्हा एक झाड तोडले जाते तेव्हा एक संपूर्ण अन्नजाळे विस्कळीत होते. त्यावर गुजराण करणारे पक्षी, त्या मातीचा जैविक फ्लोरा, रायझोस्पिर, मिळणारी शुद्ध हवा यावरसुद्धा परिणाम होतो. त्यामुळे आज गरज आहे ती संतुलनाची, धर्मग्रंथांनी व संतांनी दिलेला संदेश केवळ वाचण्यासाठी नसून, तो आचरणात आणण्यासाठी आहे. झाडे वाचवण्यासाठी केवळ कायदे बनवणे, एक झाड तोडून त्या बदल्यात वृक्षारोपण करणे हे आपले पर्यावरणाबद्दल कर्तव्य बनत नाही, तर आहे ती हजारो वर्षांपासूनची झाडे जपणे, हे आपल्या धर्माचे, संस्कृतीचे आणि भविष्यासाठीच्या जबाबदारीचे पालन आहे. नाशिकसारख्या पवित्र भूमीत हा संदेश अधिक ठामपणे पाळला गेला पाहिजे.

Development or Destruction?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago