कुशावर्तावर भाविक असुरक्षित अन् कोंडी

श्रावणात दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? ग्रामस्थांचा सवाल

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
“कुशावर्ती करितां स्नान। त्याचें वैकुंठीं राहणें॥“ हे संतवचन सर्वपरिचित आहे. मात्र, सध्या त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ आणि परिसराची झालेली दुरवस्था पाहता, येथे स्नानासाठी येणारे भाविक या अडथळ्यांमुळे धोक्यात सापडल्याचे चित्र आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा मुख्य केंद्रबिंदू असलेला कुशावर्त घाट सध्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. दररोज येणारे हजारो भाविक येथे जीव मुठीत धरून वावरत आहेत.
आगामी श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे सुमारे 15 लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे. विशेषतः श्रावणी सोमवारी एकाच दिवशी 2 लाखांहून अधिक भाविक या परिसरात दाखल होतात. मात्र, सध्याची परिस्थिती भयावह आहे. पुरातत्व खात्याने संवर्धनाच्या नावाखाली मांडलेला पसारा, कामाची संथ गती आणि पडझड होत असलेल्या मंदिरांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सिहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या गप्पा मारल्या जात आहेत. जिल्हा प्रशासन, कुंभमेळा प्राधिकरण आणि पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी सातत्याने येथे पाहणीसाठी येतात. अगदी मध्यरात्रीही निरीक्षण पथके हजेरी लावतात; मात्र कोणालाही येथील गंभीर परिस्थिती आणि भाविकांची गैरसोय दिसत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
कुशावर्त घाट हा राज्य पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्थळांच्या यादीत येतो.
गेल्या वर्षभरापासून येथे संवर्धनाचे काम सुरू आहे. यासाठी लोखंडी पाईपचे भले मोठे सांगाडे (पहाडी) उभे केले आहेत. अत्यंत संथ गतीने सुरू असलेले हे काम बहुतांश वेळ बंदच असते.
अडथळ्यांचा चक्रव्यूह : अगोदरच कुशावर्त घाटाचा विस्तार मर्यादित आहे; त्यात अर्ध्याहून अधिक भाग लोखंडी पाईप आणि हिरव्या जाळीने बंद करण्यात आला आहे.
अपघाताची भीती: श्रावण महिन्यात गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी किंवा धावपळ झाल्यास भाविक या चक्रव्यूहात अडकून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुशावर्त परिसरातील ऐतिहासिक गंगा गोदावरी मंदिराच्या छताचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.
छताचा भाग काढल्याने मातेची पूजा-अर्चा थांबली असून दर्शनी भागात दगड विखुरलेले आहेत.
कच्ची डागडुजी : नुकत्याच झालेल्या वादळी पावसात नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी कोसळणारे लोखंडी सांगाडे नायलॉनच्या दोर्‍यांनी बांधल्याने मोठा अपघात टळला.
साहित्याची नासाडी : मंदिरासाठी आणलेले कोट्यवधी रुपयांचे महागडे लाकूड भर पावसात उघड्यावर भिजत पडले असून, यात सरकारी निधीचा प्रचंड अपव्यय होत असल्याचे दिसते.

ऐतिहासिक मंदिरांची पडझड

कुशावर्त घाटाच्या परिसरातील इतर लहान-मोठ्या दगडी मंदिरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड होत आहे. वादळी पावसामुळे काही मंदिरांच्या कळसाचे दगड खाली कोसळले आहेत, तर अनेक भाग निखळण्याच्या अवस्थेत आहेत. या पडझडीकडे पुरातत्व विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत असून, हा निष्काळजीपणा भाविकांच्या जीवावर उठणारा ठरत आहे. प्रशासनाने आणि पुरातत्व विभागाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन सुरक्षेचे उपाय योजावेत आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी आग्रही मागणी त्र्यंबकेश्वरचे ग्रामस्थ व भाविकांकडून केली जात आहे.

Devotees face insecurity and congestion at Kushavarta.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *