मनपा निवडणुकीत 1,390 जण रणांगणात; 635 इच्छुकांची माघार
♦ सिडको, पंचवटीमध्ये राडा ♦ भाजपसमोर बंडखोरांचे आव्हान
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात यंदा तब्बल 1,390 इच्छुक आपले नशीब अजमावणार आहेत. शुक्रवारी (दि.2) तब्बल 635 इच्छुकांची माघार झाली. माघारीच्या शेवटच्या दिवशी सिडको, पंचवटी व पूर्व विभागात माघारीवरून मोठ्या नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या.
प्रभाग 29 मधील उमेदवारीवरून मुकेश शहाणे यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट होऊनही बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला, तर माजी नगरसेवक देवानंद बिरारी व त्यांची पत्नी यांचा प्रभाग 31 मधील भाजप उमेदवार बालम शिरसाठ यांच्यामध्ये शिवीगाळ होऊन प्रकरण हाणामारीपर्यत गेले. पंचवटीत बंडखोर उमेेदवारास समर्थकांनी घरात कोंडून घेतले. याशिवाय माजी नगरसेविका रुची कुंभारकर यांना काही मिनिटे उशीर झाल्याने त्यांची माघार होऊ शकली नाही. नाशिक पूर्व विभागात नंदू कहार यांनी स्थानिक आमदारांवर गंभीर आरोप केले.
दरम्यान, एबी फॉर्मच्या गोंधळावरून भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला. सुधाकर बडगुजर यांच्या घरात तीन उमेदवारीवरून आ. सीमा हिरे यांनी मंत्री महाजन यांना टाळत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे तक्रार केली. त्यामुळे ना. महाजन यांना हिरे यांनी का टाळले, याचीच भाजपमध्ये चर्चा होती.
शुक्रवारी बडगुजर यांनी त्यांची पत्नी हर्षा बडगुजर व पुत्र दीपक याची प्रभाग 25 मधील उमेदवारी अर्ज मागे घेतले. परंतु प्रभाग 29 मधील उमेदवारी कायम ठेवत माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना बाद केले. परिणामी शहाणे यांच्यावर अपक्ष निवडणूक लढण्याची वेळ ओढावल्याचे चित्र आहे.
शहरातील दहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांत छाननी प्रक्रिया राबविल्यानंतर माघारीसाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला होता. माघारीनंतर निवडणुकीच्या रिंगणात 1,390 उमेदवार आहेत.
शहरातील 31 प्रभागांतील 122 जागांसाठी साडेतेरा लाख मतदार महापालिकेत नवे कारभारी पाठवणार आहेत. 23 डिसेंबरपासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होऊन 30 डिसेंबरपर्यत अर्ज स्वीकारले गेले. सात दिवसांत तब्बल तेवीसशेहून अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर छाननीत 277 अर्ज बाद केले गेले. दराम्यान, अर्ज माघारीच्या दोन दिवसांत मोठे नाट्य दिसले.
पक्षनिहाय संख्या
भाजप- 118
शिंदेसेना- 80
ठाकरेसेना- 82
मनसे- 29
राष्ट्रवादी शरद पवार गट – 29
राष्ट्रवादी अ. प. गट- 30
The rebellion in Nashik has cooled down.