संपादकीय

दानाचे महत्त्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने विकत घेण्याचा प्रघात पूर्वापार चालत आला आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले असतानाही धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने विकत घेणार्‍यांमध्ये मात्र कमतरता आलेली नाही. या दिवशी सोने विकत घेतल्यामुळे वर्षभर धनलक्ष्मी आपल्या घरात वास करते, असा समज आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वर्षभराचा जमाखर्च द्यायचा असतो. पूर्वी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेले धन धार्मिक आणि सत्कार्यात व्यय केले जात असे. त्यामुळे दान करणार्‍याच्या घरात नेहमीच धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने वास करत असे. अर्थात कमावलेले धन कोणाकडून ओरबाडून घेतलेले किंवा अन्य कोणाच्या कष्टाचे नसावे. स्वतः मेहनत करून कमावलेले धनच फलद्रूप होते. पूर्वीचे राजे वर्षाच्या शेवटी आपला खजिना सत्पात्रे दान करून रिता करायचे. मंदिरांना, आश्रमांना, गुरुकुलांना, गोशाळांना आणि गरजवंतांना ते धन दान करायचे. या दानातून त्यांना अलौकिक समाधान मिळायचे. यामुळे जनता आणि राजा यांच्यातील संबंध हे कौटुंबिक स्वरूपाचे होते.
राजाचा खजिना हा जनतेचा असून, राजा त्याचा केवळ सांभाळ करणारा विश्वस्त आहे, ही भावना त्यावेळी राजांमध्ये असे. त्यामुळे जनता कर देताना आडकाठी न करता स्वतःहून तो राजदरबारी देत असे. त्यामुळे साहजिकच पुन्हा खजिना भरत असे. पूर्वीचे राजे हे सात्त्विक प्रवृत्तीचे आणि प्रजाहितदक्ष असत. त्यामुळे राज्यात कधी स्वार्थ बोकाळत नसे. पूर्वीच्या राजांची तुलना आताच्या राजकारण्यांशी केल्यास आताचे बहुतांश राजकारणी हे केवळ
स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या हिताला प्राधान्य देणारे असतात. जनतेची सेवा करण्यासाठी म्हणून निवडणूक लढवायची आणि निवडून आल्यावर मात्र त्याच जनतेकडे सोयीस्करपणे पाठ करायची. सत्तेची खुर्ची आली की तिचा उपयोग आपली तिजोरी भरण्यासाठी करायचा. निवडणुकीत व्यय केलेला पैसा दहापटीने वसूल करायचा. जोपर्यंत खुर्ची आहे तोपर्यंत आपल्या पुढच्या कित्येक पिढ्या बसून खातील इतके धन गोळा करायचे. जनतेला स्वधन देणे सोडा पण विविध योजनांतून जनतेला सरकारी तिजोरीतून मिळणार्‍या धनावरसुद्धा यांचा डोळा असतो. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी देशातील भ्रष्टाचारावर भाष्य करताना म्हटले होते ‘सामान्य लोकांच्या योजनांसाठी दिल्लीतून निघालेल्या 100 रुपयांपैकी सामान्य लोकांपर्यंत केवळ 10 रुपयेच पोहोचतात.’ उरलेले 90 रुपये स्वार्थांध राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी लाटतात. निवडणूक जवळ आली की, महिनाभर मतदार नागरिकांच्या हातापाया पडायचे, पैसे, भेटवस्तू, खाद्य आणि मदिरा यांच्या मोबदल्यात त्यांचे मत आपल्या पदरी पाडायचे आणि उरलेले 4 वर्ष 11 महिने सत्तेचा मलिदा लाटायचा. धनतेरस खर्‍या अर्थाने स्वार्थापासून धनाच्या लालसेपासून दूर राहण्याची शिकवण देते. ही शिकवण पूर्वीचे राजे आचरणात आणत असत. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे गोडवे आजही जगभरात गायले जातात. आज अनेकांचे आयुष्य पैसा कमावण्यात आणि त्यांचा संचय करण्यात व्यय होते. उतारवयात जेव्हा शरीर साथ देईनासे होते तेव्हा आयुष्यात दानधर्म, पुण्यकर्म न केल्याचा पश्चात्ताप होतो. धनतेरस आपल्याला धनाचा संचय करण्याचा नव्हे तर सन्मार्गाने कमावलेले धन सत्कार्यात व्यय करण्याची शिकवण देते. ज्याप्रमाणे ज्ञान इतरांना दिल्याने वाढते त्याप्रमाणे सत्पात्रे दान केल्यास घरात लक्ष्मीचा वास चिरंतर राहतो. यंदा धनत्रयोदशी साजरी करताना त्यामागील अर्थ समजून घेऊन ती साजरी करूया!

‘Dhanatrayodashi’ – highlighting the significance of charity!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

उजव्यांना धडा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे दोघेही पुराणमतवादी आणि उजव्या विचारसरणीचे…

7 hours ago

रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी मोहीम सुरू

नाशिक : विशेष प्रतिनिधी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भुसावळ विभागाने प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान स्फोटक, ज्वलनशील किंवा…

7 hours ago

नाकाबंदीत दोन टेम्पो, ट्रकसह 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

दहिवाळ, दरेगाव परिसरात वनविभागाची कारवाई मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव वनपरिक्षेत्रात अवैध लाकूड वाहतुकीविरोधात वनविभागाने कारवाई…

7 hours ago

नाशिकरोडच्या कारागृहात रक्षकाच्या अंगझडतीत सापडले 33 ग्रॅम चरस!

कैद्यांना विक्रीसाठी आणल्याचा संशय; गुप्तांगाजवळ अंडरपॅन्टमध्ये टेपने गुंडाळून ठेवला होता अमली पदार्थ नाशिकरोड : विशेष…

7 hours ago

दारू पिण्यास नकार दिल्याने रिक्षाचालकाला मारहाण

सातपूरमधील कार्बन नाका परिसरातील घटना सिडको : प्रतिनिधी दारू पिण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पाच जणांनी…

8 hours ago

महापालिकेच्या विविध विभागांतून जमा झालेली 14 लाख 80 हजार 336 रुपयांची रोकड घेऊन दोन कर्मचारी पसार

सिडको : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या विविध विभागांतून जमा झालेली 14 लाख 80 हजार 336 रुपयांची…

8 hours ago