चांदवडला किडनी रुग्णांना दिलासा; रुग्णालयात 8 बेडची सुविधा
चांदवड : वार्ताहर
एचएएल आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस विभाग कार्यान्वित आहे. ही सुविधा ग्रामीण भागातील किडनी रुग्णांसाठी संजीवनी ठरणार आहे. या सुविधेमुळे रुग्णांना आता अत्याधुनिक उपचार वेळेवर मिळणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.
येथील उपजिल्हा रुग्णालयात 27 नोव्हेंबरपासून हा विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. या विभागात 6 अधिक 2 असे एकूण 8 अत्याधुनिक डायलिसिस बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे एकाच वेळी 8 रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. विभाग सुरू झाल्यापासून आतापर्यंत चार रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. संबंधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, शहरासह परिसरातील किडनी रुग्णांना स्थानिक ठिकाणी डायलिसिसची सुविधा उपलब्ध झाली आहे.
त्रास अन् खर्च वाचणार
यापूर्वी डायलिसिस उपचारांसाठी चांदवड, वडनेरभैरव, दिंडोरी, सटाणा, कळवण, उमराणा व परिसरातील रुग्णांना नाशिक किंवा इतर मोठ्या शहरांत धाव घ्यावी लागत असत. यात रुग्णांचा वेळ, पैसा आणि शारीरिक कष्ट मोठ्या प्रमाणावर खर्च होत होते. आता ही सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध झाल्याने रुग्णांची होणारी धावपळ थांबणार आहे. प्रशासनाने भविष्यात या विभागाच्या क्षमतेत आणखी वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.
तज्ज्ञ कर्मचार्यांची नियुक्ती
डायलिसिस विभागाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विशेष प्रशिक्षित पथकाची नेमणूक केली आहे. यात 2 डायलिसिस टेक्निशियन, 1 स्टाफ नर्स आणि 1 स्वच्छता कर्मचार्याचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांवर उपचार करतील. तसेच, या विभागात होणारे सर्व उपचार महात्मा जोेतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पूर्णपणे मोफत दिले जाणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना आधार मिळणार आहे.
चांदवड उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस सुविधा सुरू झाल्याने गोरगरीब रुग्णांची सोय झाली आहे. चांदवडसारख्या ग्रामीण भागात ही सुविधा मिळत असल्याने गैरसोय मिटणार आहे. विशेषतः योजनांचा लाभ मिळणार असल्याने मोफत उपचार होतील. यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व स्टाफची नियुक्ती केली आहे.
-डॉ. राहुल आहेर, आमदार
Dialysis will be done at the sub-district hospital.