खड्डे, चिखल, मूलभूत सुविधांअभावी नागरिकांमध्ये संताप
निफाड : विशेष प्रतिनिधी
चांदोरी येथील बसस्थानकाची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात प्रवाशांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे. बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने त्यात पावसाचे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
वारंवार तक्रारी करूनही एसटी प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चांदोरी हे परिसरातील महत्त्वाचे केंद्र असल्याने येथून दररोज शेकडो प्रवासी व विद्यार्थी ये-जा करतात. मात्र, बसस्थानकाचे रस्ते पूर्णपणे उखडल्याने बस येताना-जाताना चिखलमिश्रित पाणी आणि खडी प्रवाशांच्या अंगावर उडते. बसमध्ये चढताना-उतरताना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताची भीती वाढली आहे.
बसस्थानकात मूलभूत सुविधांचाही प्रचंड अभाव आहे. पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय नाही, तसेच सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आलेले नाहीत. सर्वांत मोठी अडचण स्वच्छतागृहाची असून, सुविधा नसल्याने महिला, वृद्ध व दिव्यांग प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच काही नागरिकांकडून उघड्यावर शौच केली जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. साचलेले पाणी आणि कचर्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या समस्येची तातडीने दखल घेऊन खड्डे बुजवावेत, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी व सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चांदोरी येथील बसस्थानकात विविध समस्यांमुळे प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. पुढील वर्षी येणार्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने हे बसस्थानक महत्त्वपूर्ण आहे. मात्र, सध्याची प्रचंड अस्वच्छता, खड्डे आणि दुर्गंधी पाहून प्रवासी हतबल झाले आहेत. एसटी महामंडळ प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येची तातडीने दखल घेणे
गरजेचे आहे.
– संतोष टर्ले, निवृत्त न्यायाधीश, चांदोरी
Dilapidated state of Chandori bus stand; passengers inconvenienced.