दूध भेसळीच्या संशयावरून छापा; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
सिन्नर : प्रतिनिधी
दूध भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सिन्नर तालुक्यात मोठी कारवाई करत 17 लाख 37 हजार 529 रुपयांचा विनापरवाना दूध पावडरचा साठा जप्त केला. रामपूर-पुतळेवाडी येथे शनिवारी (दि. 4) ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी प्रशांत रोहिदास काळे (23, रा. रामपूर-पुतळेवाडी) याच्याविरोधात वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळखोरांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने सिन्नरच्या पूर्व भागात अचानक धाड टाकली. शहा, कारवाडी आणि पुतळेवाडी परिसरात पोलिस बंदोबस्तात तपासणी मोहीम राबविण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी संदीप तोरणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयिताकडे कोणताही वैध अन्न परवाना किंवा खरेदी-विक्रीची कागदपत्रे नसताना मोठ्या प्रमाणात दूध पावडरचा साठा आढळून आला. हा साठा दूध भेसळीसाठी वापरला जाणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सरोवर करीत आहेत. एफडीएच्या पथकाने परिसरातील आणखी काही ठिकाणी तपासणी केल्याची चर्चा असून, काही खवा उत्पादन केंद्रांचीही पाहणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
कारवाईने परिसरात खळबळ
‘एफडीए’च्या कारवाईची माहिती पसरताच सिन्नरच्या पूर्व भागात खळबळ उडाली. शहा परिसरातील काही दुकाने, टपर्या व हॉटेल्स काही काळ बंद ठेवण्यात आल्याची चर्चा होती. प्रशासनाच्या या मोहिमेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, दूध भेसळ करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हा मुद्देमाल जप्त
कारवाईत ‘अग्रणी’ स्किम्ड मिल्क पावडरच्या 60 गोण्या, ‘मिल्कीमिस’ डेअरी परमिट पावडरच्या 169 गोण्या, ‘विल्वी’ लॅक्टोज रिच व्हे परमिट पावडरच्या 49 गोण्या आणि ‘सोनाई’ व्हे परमिट पावडरच्या 58 गोण्या असा एकूण 17.37 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Milk powder stock worth ₹17.37 lakh seized in Sinnar.