दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली, ती प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतरच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तेव्हा त्यांनी, तुम्ही कोणतीही काळजी करू नका. देशाकडे लक्ष देण्यासाठी आता सुप्रिया सुळे तयार आहेत. सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद आणि मार्गदर्शन करत राहा, असे सांगितल्यानंतर विलीनीकरणाची चर्चा अधिक जोर धरू लागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सहा वरिष्ठ नेत्यांनी नोव्हेंबरच्या सुरुवातीला दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतरही विलीनीकरणाची चर्चा वाढत गेली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाची शक्यता अनेकदा फेटाळली. दिल्लीत संसदीय समितीच्या बैठकीच्या निमित्ताने त्यांची व प्रफुल्ल पटेल यांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी विलीनीकरण हा मनोरंजनाचा विषय झाल्याचे सांगून शक्यता फेटाळली होती. लोकसभा व विधानसभा मतदारसंघाचे परिसीमन करून व मतदारसंघांची संख्या वाढवून महिलांना आरक्षण देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. यासंबंधीचे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत फेटाळले गेल्यानंतर, तेच विधेयक परत मांडण्याचा सरकारचा विचार आहे, पण ते मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत नसल्याने गृहमंत्री शहा यांनी सर्व राज्यांत लोकसभेच्या 50 टक्के जागा वाढविण्याचा प्रस्ताव विरोधकांसमोर मांडला आहे. यात कोणत्याही राज्यावर विशेषतः दक्षिणेतील राज्यांवर अन्याय होणार नाही, असा त्यांचा दावा आहे. हा प्रस्ताव विरोधकांनी मान्य केला, तर मतदारसंघांची संख्या वाढवून महिलांना आरक्षण देण्याचा सरकारचा उद्देश साध्य होईल. अमित शहा यांचा 50 टक्क्यांचा प्रस्ताव विचार करण्यासारखा आहे, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्यानंतर, त्या भाजपाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याचा अर्थ काढण्यात आला. सन 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती नव्हती, त्यावेळी भाजपाला बहुमतासाठी जागा कमी पडल्या, तेव्हा शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाचा पाठिंबा देऊ केला होता. त्यावेळी शरद पवार भाजपासोबत जाणार आहेत काय? यावर चर्चा झाली होती; परंतु त्यांनी आतापर्यंत भाजपासोबत कोणतीही आणि कोणत्याही प्रकारे हातमिळवणी केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध राहिले आहेत. सरकारच्या एखाद्या चांगल्या निर्णयाचे स्वागत करून सकारात्मक भूमिका घेण्यासही ते तयार असतात. लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांंनी वाढविण्याच्या प्रस्तावावर आजारपणामुळे ते मत व्यक्त करू शकले नसतीलही, पण खासदार सुळे यांनी मत व्यक्त केल्याने त्या व त्यांचा पक्ष भाजपासोबत जात असल्याचा अनर्थ काढला जात आहे. मात्र, शरद पवार यांच्या पक्षातील काहींचा भाजपाबरोबर जाण्यास विरोध असल्याचे दिसते. शरद पवार यांच्या भूमिकेचे नेहमीच जोरदार समर्थन करणारे आणि भाजपावर टीका करणारे जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा यांनी सुप्रिया सुळे यांच्या मताला थेट विरोध केला. इतकंच नव्हे, भाजपावर निशाणा साधला. माझा पक्ष डीलिमिटेशन बिलाला (परिसीमन विधेयकाला) पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते. मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डीलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित बिलामुळे विरोधकांना जिंकता येणार्या जागा मर्यादित होऊन भाजपाला अनुचित राजकीय फायदा मिळेल. बिलाला पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या आणि संविधानाच्या विरुद्ध जाणे होईल. माझ्या पक्षाने या निर्णयाचा फेरविचार करावा. नैतिकतेचा विजय असो, अशी पोस्ट नताशा आव्हाड यांनी सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेनंतर केली. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नताशा आव्हाड या सरचिटणीस आहेत. पक्षाने विधेयकाला पाठिंबा दिल्यास त्याचा तीव्र निषेध केला जाईल, असे त्यांनी म्हटले. डीलिमिटेशन आवश्यक असू शकते, पण प्रस्तावित बिल विरोधकांच्या जागा मर्यादित करून भाजपाला फायदा देणारे आहे, असे मत त्यांनी मांडले आहे. नताशा यांचे वडील जितेंद्र आव्हाड यांनी यावर सावध भूमिका घेतली. माझ्या मुलीला, तिचे मत मांडण्याचा अधिकार आहे. तिची वेगळी भूमिका असू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेईल, अशी टिप्पणी करताना त्यांनी मुलीच्या मताचे समर्थन केले नाही. यावर सुप्रिया सुळे यांनी वडील-मुलगी यांचे मत वेगळे असणे स्वागतार्ह असल्याचे म्हटले. त्यांनी नताशाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असेही स्पष्ट केले. नताशा यांना मत मांडण्याचा अधिकार असल्याचे सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी मान्य करून वाद वाढविला नसला, तरी शरद पवार यांच्या पक्षात सर्वच काही आलबेल नाही. जितेंद्र आव्हाड भाजपाला नेहमीच विरोध करत आले आहेत, हे लक्षात घेता, त्यांच्या कन्याही विरोध करत आहेत, हे स्पष्टपणे दिसत आहे. नताशा यांनी यापूर्वीही अशीच भूमिका मांडली होती. 2022 मध्ये शिवसेनेतील बंडामुळे उद्धव ठाकरे सरकारने बहुमत गमावल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांची भविष्यातील राजकीय दिशा यावर चर्चा सुरू झाली होती. याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्कात असल्याचे वृत्त आले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ’एनडीए’च्या वाटेवर जात आहे काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात तापली होती. 14-15 जुलै रोजी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर 22 जुलै रोजी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटींमुळे दोन्ही राष्ट्रवादी गटांतील नेते भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्कात असल्याची चर्चा तीव्र झाली. या पार्श्वभूमीवर नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून राष्ट्रवादी ’एनडीए’च्या वाटेवर जात आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या निर्णयाविरुद्ध थेट विरोध करत नव्हत्या, पण पक्षाच्या राजकीय दिशेबद्दल प्रश्न उपस्थित करत होत्या. चव्हाणसाहेब (यशवंतराव) व पवारसाहेब (शरद पवार) यांनी आम्हाला घडविले, तर अरुणजी (जेटली) व अटलजी (वाजपेयी) यांनी विरोधकांना आकार दिला. आमचे मतभेद आहेत; मनभेद नाहीत, अशा स्वरूपाचा सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ आहे. यावरही नताशा यांनी मत व्यक्त केले. भाजपाची निर्मिती आणि मूल्ये यांत हेडगेवार, सावरकर आणि अडवाणी यांचाही वाटा आहे, असे म्हणत नताशा यांनी सैद्धांतिक प्रश्न उपस्थित केला. नताशा आव्हाड या पक्षात युवकांचे प्रतिनिधित्व करणार्या नेत्या आहेत. त्यांच्या म्हणण्याला पक्षातील कोणत्याही नेत्यांनी समर्थन दिले नाही. मात्र, त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या कथित किंवा संभाव्य निर्णयाला थेट विरोध केला आहे.
Direct opposition
लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…
कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…
सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…
अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…
महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…
ऊसतोड कामगारांचे हाल; बागांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव शक्य निफाड : तालुका प्रतिनिधी उन्हाच्या तीव्रतेनंतर अवघ्या…