काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाची देशविदेशात चर्चा होत आहे. महाराष्ट्रातही पुस्तक
चर्चेत आले आहे. या पुस्तकात सावरकरांची बदनामी केल्याचा दावा करून शिवसेनेने पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सावरकरांविषयी वाद तसा नवीन नाही, तर तो जुनाच आहे. काँग्रेस पक्ष सावरकरांची बदनामी करत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी एका पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांचे पुस्तक फाडले. पुस्तक फाडताना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटोही अनवधानाने फाडला गेला. यावरून राजकारण तापले आहे. आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार, असा दावा करणार्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला. त्यामुळे प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि काँग्रेसला राजकारण करण्याची आयतीच संधी मिळाली. शायना एनसी यांच्या हातून फोटो फाडला गेला. बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन असतो. या दिनाच्या दुसर्याच दिवशी (18 नोव्हेंबर) फोटो फाडला गेल्याचा प्रकार घडला, त्याचे पडसाद उमटणे साहजिकच आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेतली. शायना एनसी यांच्याकडून चुकीने आणि अनवधानाने हा प्रकार घडला आहे, असा खुलासा त्यांनी केला. त्या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे हे मणिशंकर अय्यर यांना जोडे मारताना दिसत होते. शायना एनसी यांना अय्यर यांचा भाग फाडायचा होता, असा बचाव त्यांनी केला. आपला व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सादर केला जात असल्याचा दावा शायना एनसी यांनी सुरुवातीला केला होता. मात्र, वाढता रोष पाहून त्यांनी दुसर्या दिवशी (19 नोव्हेंबर 2026) माफी मागितली. बाळासाहेब ठाकरेंचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, तर केवळ मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडायचा होता, असा खुलासा त्यांनी केला. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आक्रमक प्रतिक्रिया दिली. ‘हे’ लोक बाहेरून आलेले भाडोत्री असून, त्यांना ना बाळासाहेबांचा विचार आहे, ना निष्ठा, असे राऊत यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ठरवून फाडला गेला का, असा प्रश्न उपस्थित होत असून, या लोकांना जाहीरपणे चाबकाचे फटके दिले पाहिजेत, असेही ते म्हणाले. सुषमा अंधारे यांनीही टीका केली. ज्या बाळासाहेबांमुळे या नेत्यांना राजकीय ओळख मिळाली, त्याच बाळासाहेबांचा फोटो फाडण्याचे भानही त्यांना राहिले नाही, असे त्या म्हणाल्या. मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मनसे व काँग्रेस नगरसेवकांनीही घोषणाबाजी केली. अनेक शहरांमध्ये ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी शायना एनसी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी टीका करत स्वतःच्याच शिवसेना पक्ष संस्थापकांचा फोटो फाडल्याची टिप्पणी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या कृतीला ‘मानसिक दिवाळखोरी’ असे संबोधले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेचा निषेध केला. हा केवळ एका छायाचित्राचा अपमान नसून, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि लाखो शिवसैनिकांच्या भावनांचा अपमान आहे, असे त्या म्हणाल्या. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणार्या, त्यांना दैवत मानणार्या शिवसैनिकांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न शिवसेना व काँग्रेस नेत्यांनी केला आहे. शायना एनसी या प्रसिद्ध फॅशन डिझायनर, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. मुंबईचे माजी शेरीफ (नगरपाल) आणि सामाजिक कार्यकर्ते नाना चुडासमा यांच्या त्या कन्या आहेत. त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून राज्यशास्त्राचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. अमेरिकेतील न्यू यॉर्क येथील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षणही घेतलेले आहे. फॅशन दुनियेत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांचे नाव आहे. ‘क्वीन ऑफ ड्रेप्स’ म्हणून त्यांना ओळखले जाते. साडी नेसण्याच्या त्यांच्या अनोख्या कौशल्यामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. त्यांनी 2004 मध्ये भाजपात प्रवेश करून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. भाजपामध्ये त्यांनी राष्ट्रीय प्रवक्त्या, महाराष्ट्र भाजपाच्या खजिनदार आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या अशा विविध जबाबदार्या सांभाळल्या. दोन दशके भाजपामध्ये काम केल्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून त्यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती, काँग्रेसचे अमीन पटेल यांनी त्यांचा पराभव केला. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्यसभेच्या उमेदवारीसाठीही त्यांच्या नावाची चर्चा रंगली होती. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या नावाबाबत उत्सुकता होती. मात्र, पक्षाने ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर संधी दिली. फोटो फाडल्या प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर खर्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनवधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते, असे त्यांनी म्हटले आहे. सावरकरांची बदनामी केली म्हणून काँग्रेस आणि सोनिया गांधी यांची कोंडी करण्यासाठीच पत्रकार परिषद बोलाविण्यात आली होती, हे अगदी स्पष्ट आहे. सावरकरांचा बदनामीचा आरोप अधोरेखित करण्यासाठी जुना फोटो आणण्यात आला होता, हेही स्पष्ट आहे. ऑगस्ट 2004 मध्ये अंदमान येथील सेल्युलर जेलच्या भेटीदरम्यान तत्कालीन पेट्रोलियम मंत्री व काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुलना पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्याशी केली होती आणि दोघांची विचारसरणी ‘विभाजनकारी’ असल्याचे म्हटले होते. हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर आणि पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्यात कोणताही फरक नाही, दोघांचीही विचारसरणी समाजामध्ये फूट पाडणारी होती, असे वक्तव्य सेल्युलर जेलमधील कार्यक्रमात अय्यर यांनी केले होते. अंदमानमधील ‘स्वातंत्र्यज्योत’ स्मारकाजवळ ‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने’ या सावरकरांच्या कवितेची कोनशिला काढून त्या जागी महात्मा गांधी यांचे विचार लावण्याचे आदेश अय्यर यांनी ऑगस्ट 2004 मध्ये दिले होते. यावरून संसदेचे कामकाज सलग तीन दिवस ठप्प झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध केला होता. तोच फोटो पत्रकार परिषदेत पत्रकारांना दाखविण्यासाठी आणण्यात आला होता.
Boomerang
भारतात कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीत घरोघरी तुळशी विवाह लावण्याचा प्रघात आहे.…
1,995 मतांसह ठरले शहराचे पक्षी मानचिन्ह नाशिक : प्रतिनिधी नाशिक शहराचे पक्षी मानचिन्ह निवडण्यासाठी घेण्यात…
स्थायीत सदस्यांचा संताप; मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ : सभापती नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांना…
दिवाळीची हंगामी भाडेवाढ न करताही विभागाच्या उत्पन्नात 1.35 कोटींची वाढ नाशिक : प्रतिनिधी यंदाच्या दिवाळी…
बालके यंदा हक्काच्या लाभापासून वंचित; 2 कोटी 11 लाखांचा निधी वर्ग होणार नाशिक : प्रतिनिधी…
साकोरा, वाखारी गावांवर शोककळा नांदगाव : प्रतिनिधी नांदगाव-मालेगाव रस्त्यावर बुधवारी (दि. 18) रात्री…