‘नांदूरमध्यमेश्वर’मधून 55,778 क्यूसेकचा विसर्ग

गोदावरीला महापूर, वाहतूक ठप्प, वीटभट्ट्या पाण्याखाली, स्मशानभूमीत शिरले पाणी

निफाड : तालुका प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून 55,778 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरी व कादवा नद्यांना पूर आला आहे. परिणामी, नांदूरमध्यमेश्वर, कोठुरे आणि रौळस येथील पुलांवर पाणी आल्याने राज्यमार्ग 27 वरील वाहतूक ठप्प
झाली आहे.
धरणातून बुधवारी 4,000 क्यूसेक, तर गुरुवारी सकाळी 46,227 आणि दुपारी 12 वाजता 55,778 क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात आला. नांदूरमध्यमेश्वर पुलाला अडकलेल्या पाणवेलींमुळे पाण्याचा फुगवटा तयार होऊन पाणी पुलावरून वाहू लागले. खबरदारीचा उपाय म्हणून निफाड व सायखेडा पोलिसांनी रस्ता बॅरिकेट्स लावून बंद केला. दुसरीकडे, सायखेडा येथे प्रशासनाने तत्परतेने पाणवेली काढल्याने तेथील पूल वाहतुकीसाठी खुला राहिला. पुराचे पाणी खानगाव थडी, मांजरगाव, चापडगाव, करंजगाव, कोठुरे, शिंगवे, काथरगाव, सायखेडा, गोंडेगाव व चांदोरी परिसरातील शेतात शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गोदाकाठावरील वीटभट्ट्या व कृषिपंप पाण्याखाली गेले असून, नांदूरमध्यमेश्वर येथील स्मशानभूमीतही पाणी शिरले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Discharge of 55,778 cusecs from Nandur Madhmeshwar.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *