राज्यात रक्ताची तीव्र टंचाई

नाशिक : प्रतिनिधी
राज्यात सध्या गंभीर रक्तटंचाई निर्माण झाली असून, थॅलेसेमियाग्रस्त मुलांसह अपघातग्रस्त, कर्करोग रुग्ण, हृदयविकार रुग्ण, मोठ्या शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, तसेच प्रसूतीतील महिलांच्या उपचारांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. रक्तपेढ्यांमधील साठा झपाट्याने कमी होत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तासाठी सतत धावपळ करावी लागत आहे. मागणी दहा बॅगची असताना मिळतात केवळ तीन, अशी परिस्थिती शहरातील रक्तपेढ्यांची झाली आहे.
उन्हाळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिरांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले. शाळा, महाविद्यालये आणि खासगी कंपन्यांना सुट्ट्या असल्याने नियमित रक्तदाते उपलब्ध राहत नाहीत. अनेक विद्यार्थी व युवक गावाकडे गेल्याने शैक्षणिक संस्थांमधील शिबिरे बंद पडली आहेत. कर्मचारी रजेवर असल्याने उद्योग क्षेत्रातील रक्तदान उपक्रमांवरही परिणाम झाला आहे.
वाढत्या उष्णतेमुळे नागरिक रक्तदानासाठी पुढे येण्यास टाळाटाळ करीत असल्याचे रक्तपेढ्यांनी सांगितले. डिहायड्रेशन, अशक्तपणा याबाबतची भीती, तसेच गैरसमजामुळे रक्तदानाचे प्रमाण आणखी कमी झाले आहे.
सध्या काही रुग्णालयांत
ओ पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह आणि एबी निगेटिव्ह रक्तगटांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी रक्तदाता आणल्याशिवाय रक्त उपलब्ध करून दिले जात नसल्याचेही चित्र आहे.

उन्हाळ्यात विशेष रक्तदान मोहीम राबविण्याची मागणी पुढे आली आहे. शाळा, महाविद्यालये, उद्योग संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे आयोजित केल्यास रक्तटंचाईवर नियंत्रण मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. प्रत्येक नागरिकाने वर्षातून किमान दोनदा रक्तदान करण्याचा संकल्प केल्यास हजारो रुग्णांना नवजीवन मिळू शकते.
अर्पण रक्तपेढी आणि अर्पण थॅलेसेमिया अ‍ॅण्ड सिकलसेल सोसायटीच्या वतीनेही नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
अर्पण रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर तातेड यांनी नागरिक, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.

नाशिकमधील अर्पण थॅलेसेमिया अ‍ॅण्ड सिकलसेल सोसायटीत सुमारे 550 थॅलेसेमिया रुग्ण नोंदणीकृत आहेत. रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने त्यांच्या नियमित उपचारांत अडथळे येण्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. रक्त वेळेवर न मिळाल्यास हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊन रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. नागरिक, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत.
– डॉ. नंदकिशोर तातेड, अध्यक्ष, अर्पण रक्तपेढी, नाशिक

रक्तटंचाईवर मात करण्यासाठी व्यापक जनजागृती आणि नियमित रक्तदान अत्यावश्यक आहे.
– डॉ. वैशाली काळे, वैद्यकीय संचालक, अर्पण रक्तपेढी

Severe blood shortage in the state

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *