सीईओ ओमकार पवार : नावीन्यपूर्ण योजनांसह सामाजिक, शैक्षणिक व विकासाला प्राधान्य
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा परिषदेचे 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचे वार्षिक अंदाजपत्रक मंगळवारी (दि. 24) सादर करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या उपस्थितीत अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यंदाच्या अंदाजपत्रकात खेळाडूंसाठी सुपर-25, शेतकर्यांसाठी एआय प्रशिक्षण, दिव्यांगांसाठी तंत्रस्नेही उपक्रम, तृतीयपंथींसाठी, तसेच मैला साफ करणार्या महिलांसाठी विविध योजनांचा समावेश केला आहे.
सीईओ ओमकार पवार यांचे नवीन प्रशासकीय इमारतीत पहिलेच अंदाजपत्रक होते.नावीन्यपूर्ण योजनांसह व्हीपीडीए प्रणालीमुळे घटलेल्या उत्पन्नामुळे अंदाजपत्रकावर परिणाम झाला असला, तरी उत्पन्नवाढीसाठी जि.प.च्या जागा, जुन्या इमारती, इतर मालमत्ता भाडेतत्त्वावर देणे आदींतून प्रयत्न करण्यात येणार आहे, असे सीईओ पवार यांनी सांगितले.
जिल्हा परिषद नाशिकचे सन 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक व सन 2026-27 चे मूळ अंदाजपत्रका जाहीर करण्यात आले. यात सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक योजनांवर भर देण्यात आला आहे.
सन 2025-26 साठी मूळ अंदाजपत्रक 60.83 कोटी होते. त्यात सुधारित अपेक्षित जमा 63.47 कोटी इतकी झाली असून, सुधारित अंदाजपत्रका 75.98 कोटींवर गेले आहे. थकीत मुद्रांक शुल्कापोटी 15 कोटी प्राप्त झाल्यामुळे जमा वाढली आहे. त्यानुसार खर्चातही वाढ करण्यात आली आहे. सन 2026-27 साठी मूळ अंदाजपत्रक 59.14 कोटी ठेवण्यात आले आहे. अपेक्षित जमा 35.50 कोटी इतकी असून, व्हीपीडीए प्रणालीमुळे जिल्हा परिषदेला मिळणार्या व्याजाच्या उत्पन्नात लक्षणीय घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मागील शिल्लक रकमांचा समावेश केल्यामुळे खर्चाची एकूण तरतूद 59.14 कोटी ठेवण्यात आली आहे. विभागनिहाय तरतुदीत शिक्षण विभागासाठी 8.71 कोटी, आरोग्य विभागासाठी 1.92 कोटी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासाठी पाच कोटी, समाजकल्याण विभागासाठी 4.47 कोटी, दिव्यांग कल्याणासाठी 2.53 कोटी, महिला व बालकल्याण विभागासाठी 2.45 कोटी, कृषी विभागासाठी 3.50 कोटी, पशुसंवर्धन विभागासाठी 3.68 कोटी, लघुपाटबंधारे विभागासाठी 1.21 कोटी, तर बांधकाम, साप्रवि, ग्रामपंचायत व वित्त या व इतर विभागांसाठी एकूण 25.67 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
अंदाजपत्रकात विविध नावीन्यपूर्ण योजनांचाही समावेश करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट जिल्हा परिषद शाळा स्पर्धासाठी 75 लाख, विद्यार्थ्यांची कल चाचणीसाठी दहा लाख, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी 2.50 कोटी, सुपर 100 निवासी प्रशिक्षण योजनेसाठी 2.00 कोटी, तर सुपर-25 क्रीडा प्रबोधिनी स्थापनासाठी 31 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागांतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना सायकल योजनेसाठी 2 कोटी, अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी 1.20 कोटी तसेच तृतीयपंथी व दुर्बल घटकांसाठी 50 लाख निधी ठेवण्यात आला आहे. दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार अनुदानासाठी 1.32 कोटी 50 हजार आणि तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी दहा लाखांची तरतूद आहे.
-शुसंवर्धन क्षेत्रात जनावरांच्या प्रदर्शनासाठी 30 लाख, दूधकाढणी यंत्रासाठी 50 लाख, तर भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण व निवारा यासाठी 95 लाख निधी देण्यात आला आहे.
कृषी विभागात ड्रोनद्वारे फवारणी प्रशिक्षण व यंत्र खरेदीसाठी 50 लाख, तसेच शेतकरी मेळावे व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापर प्रशिक्षणासाठी दहा लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, शेतकर्यांना व दुर्बल घटकांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. उपलब्ध निधीचा प्रभावी व पारदर्शक वापर करून नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे. जि.प.च्या अंदाजपत्रकात नावीन्पूर्ण योजनांचा समावेश केला असून, उत्पन्नवाढीसाठी जागा भाडेतत्त्वावर देणे, जि.प.च्या परिसरात बँक आणि कॅन्टीन, पार्किंग, तसेच जुन्या इमारतीचे भाडे यातून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
– ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिकDistrict Council’s budget of Rs 59.14 crores presented