– प्रणाली देशमुख
तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड चवींनी तृप्त करणारा. तसं पाहिलं तर आपण कित्येकदा चिवडा, चकली, लाडू वगैरे करतोच, पण खरं सांगू का? ’दिवाळीच्या फराळाची’ मजा काही औरच असते. फराळाच्या पंक्तीत करंजीला फार मान द्यावा लागतो. आता दिसायला आखीव-रेखीव, सुंदर म्हटल्यावर ती भाव खाणारच नाही का! तिच्या बनावटीचे पुराण फारच मोठे आहे, याला आपण ’इपिक’ म्हणूया…
गृहलक्ष्मीने गहू ओलवले, छान जात्यावर बारीक रवा दळला, रवा आणि कोंडा सुपाने वेगळा केला. आता रव्यापासून पिठ्ठी वेगळी करायला ’वस्त्रगाळ’ करावी लागली. कठीण, कठीण, कठीण, किती पुरुषहृदय बाई! नाक मुरडत पिठ्ठी बाहेर आली. साजूक तुपात पिठ्ठी भाजून घेतली. हलके-हलके झोका देत, मंदाग्नीवर… गोर्या-गोर्या पिठ्ठीला जास्त उष्णता सहन होत नाही, टॅन होण्याची भीती! म्हणूनच मंदाग्नीवर भाजून, गार झाल्यावर पिठ्ठीत साखर मिसळली. आधीच तुपात भाजलेल्या पिठ्ठीचा घरभर दरवळणारा सुगंध काही कमी असतो का? त्यात आणखी भरीस भर वेलची पावडर घालून तिचा परमोच्च मन प्रसन्न करणारा, रसनेला उद्युक्त करणारा खमंग वास भिंतीच्या पलीकडे शेजारणीपर्यंत जातो. पिठ्ठी स्वभावाने जरा कोरडीच! म्हणून साजूक तूप घालून तिला सांगितलं जातं, पारी टिकवायची असेल तर तुला कोरडेपणा सोडून जरा ओलावा आणावा लागेल. नाजूक रव्यात साजूक तुपाचे मोहन घातले, दुधाने छान ओलावा आणून हे बंधन घट्ट झालं. अर्धा ते एक तास झाकून ठेवून काहीवेळ एकांत घोषित! पुढील तयारीला आगेकूच केली. छान उंडा प्रेमाने मळून घेतला. पोळपाट, लाटणे घेऊन सज्ज. छोटी गोळी घेऊन पातळ पारी लाटली. पारी इतकी पातळ असावी की, डब्यात करंज्या भरल्यावर काढताना बघताच लक्षात यावं-कुठली पिठ्ठीची, कुठली तिळाची, कुठली खव्याची! इतकी पारदर्शक.
पारी पाण्याच्या बोटाने एका बाजूने चिकटवून घ्यायची. हाताची पोकळ मूठ बनवून त्यामध्ये पारी ठेवायची. पारीत छोट्या चमच्याने पिठ्ठी भरायची. भरताना काळजीपूर्वक कडांना पिठ्ठी स्पर्श करणार नाही, याची दक्षता घ्यावी. अबॉर्ट न होता पारी बंद करावी. साच्यातही करंजी भरताना हीच काळजी घ्यावी. नजरेचा खेळ सगळा, नाहीतर ’नजर हटी, दुर्घटना घटी’ असं व्हायचं, म्हणूनच लक्षपूर्वक! अशी सुबक करंजी तबकात ठेवून मुलायम कपड्याने झाकूनच, कढईत टाकेपर्यंत तिला असं पालखीतच लपवायचं. कढईत तूप घालून तिला छान पोहता येईल इतके साजूक तूप हवे. हलक्या-हलक्या हाताने, मंदाग्नीवर करंजी खूपच प्रेमाने आणि अलगद तळून घ्यावी. गार झाल्यावर डब्याच्या स्वाधीन करावी. एकदा जर जिभेला चव लागली रे लागली, मग काय… ’ये दिल मांगे मोर! ’ये उन दिनों की बात है…
पूर्वी लक्ष्मीपूजन झालं की, दुसर्या दिवशी सकाळपासूनच फराळाचे आमंत्रण सुरू व्हायचे. प्रत्येक घरची चव वेगळी होती. एखाद्या प्लेटमधला अनारसा बघितल्यावर चटकन लक्षात यायचं,एक लाडावलेली व्यक्ती म्हणजे अनारसा! हे महाशय मोठे नखरेबाज! सगळ्यांना वाटतं की हा अतिशय सोपा आहे, पण कढईत गेल्यावर तो कधी पसरट होतो, तर कधी जास्तीच तूप पिऊन फुगून बसतो नवरदेव मारोतीवर रुसतो तसा हा कढईत रुसावा! त्याचे सगळे गुण मंडपापर्यंत येणार्या नवरदेवासारखेच आहेत; आला तर पटकन येतो, नाहीतर आटवून-आटवून घेतो.
फराळाच्या पंक्तीतील एक भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे चकलीबाई! हिला बघून माधुरीच्या गाण्याची आठवण येते. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज-हाय रे मेरा घागरा! खरंच, काटेदार गोल-गोल घागरा असणार्या चकलीभोवती दिवसातून कित्येक वेळा डब्याच्या आसपास आपण पिंगा घालतो आणि ती तितकीच मटकते. जिची खुसखुशीत चकली, ती संसाराच्या रेसमध्ये शेवटपर्यंत टिकली! सिरिअसली घेऊ नका, गमतीचा भाग आहे. घरात बच्चेकंपनी असल्याशिवाय चैतन्य राहत नाही… फराळाच्या परिवारातील छोटे नवाब म्हणजे शंकरपाळी! इटुकले, बिटुकले, खारे, गोड, नटखट! फार निरागस, सहसा दगा देत नाही; त्यामुळे शंकरपाळी करताना आपण बिनधास्त असतो, कारण ती फसवणूक करत नाही आणि उगाचच तोरा वगैरे दाखवून मिरवतही नाही. आदरणीय चिवडा म्हणजे छोट्या-छोट्या दाळवा, खोबरं, पोहे, मुरमुरे, कढीपत्ता, कांदा अशा कितीतरी जिन्नसांना एकत्र आणणारी शाळाच! ज्याच्या हातात हे सर्व येतात, तो मग आपल्या कल्पनेतून, आवडीतून त्यांना चिवड्याच्या रूपात घडवतो. लाडूभाऊ जरा खुशमिजाज, आपल्याच विश्वात रमलेले! कोणी पिस्ता द्या, बदाम द्या, काजू, किसमिस… काहीही दिलं तरी गुपचूप खाऊन टाकतात. अरे, काहीच नसेल तर साधी वेलची पावडरही फस्त करतात! स्वतःला लय हुशार समजणारी नटमोगरी-कोण असेल तर? शेव… शेव म्हणजे या परिवारातील शिस्तप्रिय आणि सोबतीचा वसा घेतलेली व्यक्ती! लांबसडक, कुरकुरीत आणि सोनेरी रंग बघून कुणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. ती आपला दरारा राखून असते. जाड तरी अड्जस्टमेंट करते, पण बाकीच्या मात्र स्लीम, नाजूक, जरा चिवट आणि शिष्टच! आपणच तिला अति भाव देतो, म्हणूनच अहंकार तर वाढणारच ना! पण मंडळी, हा परिवार इथेच संपत नाही बुवा! या महाकुळात आणखीही काही भारदस्त आणि लाडकी मंडळी आहेत, ज्यांच्याशिवाय दिवाळी अपूर्णच वाटेल. प्रत्येकाचा थाट वेगळा, रुबाब वेगळा आणि चवही निराळी. कुणी कुरकुरीत, कुणी मऊसूत, कुणी गोड तर कुणी तिखट! पण एक मात्र खरं, या सगळ्यांशिवाय दिवाळीचं ताट म्हणजे पाहुण्यांशिवायचं लग्न! या सगळ्या फराळामागे असते ती गृहिणींची अविरत मेहनत, प्रेम आणि आपल्या माणसांना खूश करण्याची आस. दिवाळी संपते, फराळाचे डबे रिकामे होतात; पुढच्या दिवाळीपर्यंत या डब्यांच्या आठवणी जतन करून ठेवा.