– अशोक थोरात
दुष्काळ, जीवघेणी महागाई यात दिवाळी तर संपली, पण पुढील सहा महिने सर्वांनाच व खास करून शेतकर्यांना संकटाचा सामना करावा लागेल असेच दिसते आहे. राज्यभरात खरिपाचे उत्पादन सुमारे 30 टक्केच आले म्हणजे 70 टक्के घट झाली. खर्च मात्र शंभर टक्केच झाला. यातील वर्गवारीनुसार तीस टक्के पिकांचा जेमतेम झालेला खर्च वसूल झाला तर सत्तर टक्के खर्च निघाला नाही, म्हणजेच शेतकरी कर्जबाजारी झाला. आता रब्बी हंगाम सुरू होईल. काही ठिकाणी विहिरींना जेमतेम पाणी. पुढील पीक घ्यावे का नाही ही चिंता. त्यातच मोठी धरणे पूर्णक्षमतेने भरली आहेत, पण पिण्याच्या पाण्याच्या नावाने शेतीसाठी पाणी धोरण ठरत नाही म्हणजे सावळा गोंधळच.
सहज चणकापूर व पुनंद तथा अर्जुनसागर धरणाचा विचार करता ही धरणे पूर्ण भरलेली आहेत. खाली याच गिरणा नदीवरील गिरणा डॅम पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. मग पिण्याच्या पाण्यासोबत शेतीच्या पाण्याचे नियोजन केल्यास शेतकर्यांना विहिरीचे थोडे पाणी, अधिक धरणाच्या कालव्यातून मिळणारे पाणी देण्याचे ठरल्यावर पिकांचे नियोजन होईल. वांजुळ पाणी समितीचे अध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे यांनी शेतकर्यांना पाणी देण्याची मागणी केली आहे व ही मागणी व्यवहारी आहे. मालेगाव शहराला गिरणा धरणातील पाणी वीज खर्चाचा खोडा न घालता द्या व चणकापूर व पुनंदचे पाणी किमान एक आवर्तन शेतीसाठी सहज मिळेल असा हा रास्त तोडगा सुचवला आहे. यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, आ. दिलीप बोरसे, आ. डॉ. राहुल आहेर व आ. नितीन पवारांनी मनापासून लक्ष घातले पाहिजे, अशी मागणी प्रा. अहिरेंनी केली आहे. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली उन्हाळ्यात गिरणा नदीचे म्हणजेच धरणातील पाणी सोडले जाते, हा अव्यवहारी विषय आहे. कोरड्या नदीत भरउन्हाळ्यात पाणी सोडल्याने नदीच्या दोन्ही बाजूच्या दहा – वीस टक्के शेतकर्यांना फायदा होतो, पण तेच पाणी कालवे व चारीने सोडले तर ऐंशी टक्के शेतीला लाभ मिळतो. पण ही प्रथा मोडायची कोणी, हा अवघड विषय आहे. राज्यकर्त्यांना सर्वच मतदार खूश ठेवायचे आहेत, पण यंदा जीवघेणा दुष्काळ बघून ठोस शेतकरीहिताचा निर्णय घेणे गरजेचे आहे.
महागाई जीव घेईल…
यावर्षी नेमका दुष्काळ व त्यात वाढलेली महागाई सर्वांनाच जीवघेणी ठरू शकते. दिवाळीत नाममात्र रेडिमेड फराळावर भागवावे लागले. या फराळाला आमच्याकडे हे हळूहळू कमी झाले आहे व यंदा तर विषयच संपला. कळत नकळत अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंनी घेतलेल्या कौतुकास्पद भूमिकेमुळे मोठी जनजागृती झाली. अनेकांनी खाणे टाळले. काही गोष्टी श्रद्धेेच्या नावाने असतात. तेथेसुद्धा काटकसर केली पाहीजे, उपाशी राहू, पण श्रद्धा जपू या मानसिकतेतून समाज बाहेर आला पाहिजे. पूर्वी वीज नव्हती. रॉकेलवर चिमणी, कंदील वापरावे लागत व अधूनमधून मेणबत्ती. मेणबत्तीचा वापर दिवाळीत आठवडाभर होत असे. अंगणात चहूबाजूने मेणबत्ती लावत व अंधारापासून दिवाळीचे स्वागत केले जायचे. तास-अर्धा तासात मेणबत्त्या विझायच्या. काही हवेने विझायच्या. असे चालू होते.
आता प्रत्येेक घरी दिवाळीत किलो- दोन किलो खाद्यतेल वापरून पणत्या लावल्या जातात. पूर्वी वीज नव्हती. अंधारच होता. दिवाळीचे स्वागत म्हणून थोडा उजेड केला जात होता. आता लखलखाट आहे. मोठे बल्ब आहेत. सर्वत्र दिवसाप्रमाणेच उजेड आहे. मग तेल जाळलेच पाहिजे का, तर गरज नाही. प्रथा-परंपरा, थोडी अंधश्रद्धा तेलबचत करू देत नाही. सहज लक्षात आले, पाचशे रुपयांची बचत होऊ शकते, पण तसे कुणी करीत नाही.
यावर्षी शेतमालाची चांदी व कचरा झाला. मका हे मुख्य खरीप पीक. एकरी उत्पादन ज्यांचे आले ते अर्धे आले व दर मिळाला दुप्पट. त्यांचं बरं झालं, पण हे पीक राज्यात आलेच 30 टक्के. म्हणून मका चार हजाराला गवसणी घालू शकतो किंवा केंद्र सरकार बाहेरून मका मागवून दर कमी ठेवू शकते.
दिवाळी संपली. आता तेलकट खाल्ले असेल व ते शुद्ध नसेल तर खोकल्याचे पेशंट वाढतील. डॉक्टर-मेडिकलचं चांगभलं होईल. या दिवाळीत व्यापार्यांचा व्यवसाय दर वर्षाप्रमाणे पन्नास टक्केच झाला. दुष्काळाचा फटका पन्नास टक्क्यांवर आला तो खते व औषधे विकणार्या दुकानदारांचा या व्यवसायातील मोठे दुकानदार राजू दळवी म्हणाले, की दुष्काळामुळे खूप नुकसान झाले. उधारीपण अडकली. शेवटी प्रेमाचे संबंध ठेवायचे तर थोडा संयम ठेवावाच लागतो.
के. डी. भालेराव संस्थेची नामांकित शाळा जिल्ह्यात टॉप टेनमध्ये. दुष्काळाने खूप नुकसान होत असून शाळा चालवायचीच या जिद्दीने पालकांना फीमध्ये सांभाळून घेतो, असे प्राचार्या तनया शरद भालेराव यांनी सांगितले. सचिन सूर्यवंशी फ्रीज, टीव्हीसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू विकतोे, पण दसरा- दिवाळीत 50 टक्केच विक्री झाली. दुष्काळ व पैशांची कमतरता म्हणून हे व्यवसाय नुकसानीत गेले. सचिन जाधव हा मोठा किराणा व्यापारी. तो म्हणतो, की अर्धाच व्यवसाय झाला. कापड व्यापारी, हॉटेल व्यावसायिक सर्वांनाच दुष्काळाने झटका दिला आहे.
Diwali is over; what next?