– राजेश शिरभाते
काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष, खासदार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी, इंदिरा गांधी यांच्या स्नुषा, राहुल आणि प्रियांका या दोन संघर्षरत मुलांच्या माता, या देशाच्या एक आघाडीच्या आणि सुसंस्कृत नेत्या सोनिया गांधी यांचे ’द बिलाँगिंग’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाला प्रकाशनानंतर जो प्रतिसाद मिळाला तो भूतो ना भविष्यति असा होता. एका बुद्धिमान आणि देशकार्यात वाहून दिलेल्या कुटुंबाच्या जबाबदार स्नुषेने लिहिलेल्या या पुस्तकावर लोकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. लाखो लोकांनी हे पुस्तक ऑनलाइन पद्धतीने मागवले. काहींनी पुस्तकांच्या दुकानात जाऊन खरेदी केले. पुस्तकांच्या दुकानात त्यासाठी वेगळा कक्ष मांडण्यात आला. एरवी शुकशुकाट असलेल्या पुस्तकाच्या दुकानात लोकांनी गर्दी केली. त्यातही तरुणाईने मोठी गर्दी केल्याची दृश्ये दिसली. हे पुस्तक आपल्या संग्रहात असलेच पाहिजे, अशी इच्छा प्रत्येक वाचकाची झाली आहे.
हे पुस्तक अद्याप वाचले नसल्याने या पुस्तकाबाबत आणि या पुस्तकातील काही बाबींबाबत बोलणे योग्य होणार नाही. बुद्धिप्रामाण्यवादात एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यावर व्यक्त होणे हे योग्य नाही. मात्र, हे पुस्तक आल्यानंतर समाजमाध्यमावर जी चर्चा झाली किंवा सुरू आहे त्याचा आढावा घेणे आवश्यक आहे. एखाद्या पुस्तकाकडे समाज कोणत्या नजरेने पाहतो, त्यावर त्या समाजाची विचारसरणी, प्रगल्भता, संस्कृती, संस्कार हे दिसून येत असतात. तसेच ते विरोधकांचे आणि काँग्रेस पक्षाचे दिसून आले.
सोनिया गांधी यांनी या पुस्तकाचे नाव फार विचारपूर्वक घेतले आहे, द बिलाँगिग. हे माझे आहे. मी हे घेऊन चालत आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठही सूचक आहे. यामध्ये सोनियाजींच्या छायाचित्राशिवाय इतर काही नाही. मात्र, त्याची पार्श्वभूमी ही काळ्या रंगाची आहे. सोनिया गांधी या देशात आपल्या पतीसाठी आल्या. एका मोठ्या सुसंस्कृत घराच्या सदस्य झाल्या. त्यांनी ती जबाबदारी लीलया सांभाळली. सासूबाईंची हत्या पाहिली. आपला पती गमावला. आपल्या मुलाची बदनामी सहन केली. हे सारे करताना त्यांनी कधीही ही माणसे सोडून आपल्या माहेरी परत जावे आणि सुखाचे जीवन जगावे, असा विचार केला नाही. हे त्यांचे श्रेष्ठत्व आहे. या पुस्तकात त्यांनी जे काही अनुभव आहेत ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही चांगल्या पुस्तकात व्यक्तिगत कथनाबरोबरच सामाजिक संदर्भ येत असतात. सोनियाजींचे कुटुंब आणि घर हे देशातील एक मोठे राजकीय घराणे आहे. त्यामुळे त्यांच्या पुस्तकात ते येणार हे स्वाभाविक आहे. त्यातीही त्यांचे आतापर्यंतचे जे काही संदर्भ बाहेर आले आहेत किंवा ज्यांनी वेगाने वाचले त्यांनी ते समाजमाध्यमावर सामायिक केलेले आहेत. त्यातून दोन ठळक गोष्टी जाणवतात. एक, हे पुस्तक प्रचारकी नाही. आत्ममग्न नाही. मी केलेले किंवा जे घडले त्यात माझा मोठेपणा आहे, हे दाखवणारे नाही. जे जसे घडले, त्या-त्या वेळेसचे जे विचार होते ते सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात अभिनिवेश नाही. मीच कशी मोठी आणि इतर कसे खुजे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न नाही. जे जे संदर्भ आलेले आहेत ते त्या त्या वेळेसच्या घटनांनुसार आलेले आहेत. इथे कोणावरही टीका करण्याचा किंवा कोणाला चुकीचे दाखवण्याचा प्रयत्न नाही. जे आहे ते आहे. असे ते लिहिले आहे. सहसा वयाच्या एका टप्प्यावर सामाजिक क्षेत्रातील लोकांकडून आपल्या व्यक्तिगत जीवनातील तरल क्षण लपवले जातात किंवा ते पुढे आणले जात नाहीत. सोनियाजींनी राजीव गांधी यांच्याविषयी जे लिहिलेले आहे ते त्यांच्या तारुण्यसुलभ भावनांचे प्रतिबिंब आहे. त्यात लपवाछपवी नाही. राजीव गांधी यांचे फोटो आजही पाहिले तरी त्यांचे पुरुषी सौंदर्य नजरेआड करता येत नाही. त्यांचे ते अगदी प्रतिष्ठित व्यक्तीचे चालणे, त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांची कामकाज करण्याची पद्धती. तरुणपणी आपण एका मोठ्या कुटुंबातील सदस्य असल्याचा त्यांनी टाळलेला अभिमान, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे जगण्याची त्यांची धडपड, जबाबदारी आल्यानंतर ती निभावून नेण्याची पद्धत, हे सारे काही या पुस्तकात आले आहे.
या पुस्तकाचे केवळ काँग्रेस पक्षाच्या लोकांनीच स्वागत केले असे नाही, तर सर्वसामान्य वाचकांनीही या पुस्तकाला भरभरून प्रतिसाद दिला. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या पहिल्या फळीत अनेक सुशिक्षित आणि आपापल्या क्षेत्रात यशस्वी आणि विचारवंत असलेली व्यक्तिमत्त्वे आहेत. त्यांनी या पुस्तकाचे स्वागत केले. त्याचबरोबर सर्वसाधारण प्रत्येक फळीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनीही हे पुस्तक आपलेसे केले. सर्वसामान्य कार्यकर्ते हे इंग्रजी भाषेमुळे जरी काहीसे दूर राहिलेले असले, तरी मिळेल त्या मार्गाने त्यांनी या सोनिया गांधींचे पुस्तक यशस्वी
पुस्तकाबाबत चर्चा सुरु केली. एका मोठ्या कुटुंबातील आतील बाबींबाबत सर्वसाधारण लोकांमध्ये एक प्रकारची जिज्ञासा असते. सोनियांनी ही जिज्ञासा शमवण्यासाठी काही हे पुस्तक लिहिले नाही तरी त्यानिमित्ताने जणू आपण इंदिरा गांधी यांच्या घरामध्ये काही काळ वावरल्याचे एक समाधान वाचकाना मिळत आहे. या कुटुंबाविषयी लोकांच्या मनात एक प्रेम आहे. त्यांनी या देशासाठी केलेल्या त्यागाविषयी सहानुभूती आहे, आदर आहे. त्यामुळे या घरातील बाबी सांगणारे पुस्तक म्हणूनही ते तिककेच प्रभावी ठरल्याचे दिसून येत आहे. मनोभूमिका विशद करणारे आत्मवृत्त हे आत्मचरित्रातील सर्वोच्च प्रतीचे लेखन समजले जाते तेही सोनियाजींनी लिलया पेलले आहे. त्यामुळे कोणातरी राजकीय नेत्याने कोणाकडून तरी लिहून घेतलेले आपला मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करणरे पुस्तक असे त्याचे स्वरुप नाही. कोणतेही पुस्तक किती प्रामाणिक लिहिले गेले आहे. त्यावर त्याचा प्रतिसाद ठरत असतो. वाचकांच्या हृद्याचा ठाव घेण्यासाठी त्यात सच्चेपणा असावा लागतो. तो असल्यामुळे या पुस्तकाने मोठे यश मिळवले आहे असे वाटते.
विरोधी पक्षाने नेहमीप्रमाणे या पुस्तकावर टीका केली आहे. ती होणार होती. सध्याचा विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते यांच्याकडे वाचन संस्कृती नाही. त्यामुळे आपल्या विरोधी विचारांचेही पुस्तक आपल्या वाचनात असले पाहिजे याची जाण त्यांना नाही. बरं हे सारे नसले तरी लोकसभेत आपल्याबरोबर असलेल्या एका नेत्याने लिहिलेल्या पुस्तकाचे तरी कौतुक करावे एवढाही मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे नाही. असो, त्यांची संस्कृती म्हणजे आपण लिहिले ते ब्रम्हवाक्य आणि इतरांना लिहिताच येत नाही. या विचाराचे द्योतक आहे. या पुस्तकाच्या कौतुकाच्या पोस्टखाली भाजपाच्या लोकांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आयटी सेलने लिहिलेल्या काही कॉमेंटमुळे त्यांची खरी संस्कृती उघडकीस आली आहे. त्याची वास्तविक पाहाता काही गरज नव्हती. एकेकाळी भाजपा आणि संघपरिवारामध्ये विचारी, बुद्धीमान आणि तार्किक वक्त्यांचा आणि बुद्धीवादी लोकांचा भरणा असे. ते विरोधही इतका प्रभावी आणि अभ्यासपूर्ण करत असतं की ज्याच्यावर टीका केली असले त्यालाही ते पटावे. आता ती पिढी आणि ती माणसे नाहीत. आता रसत्यावरचा ज्याला लिहिता वाचताही येत नाही असाही माणूस काही तरी सांगितलेले लिहितो. ही बौद्धिक दिवाळखोरी दाखवून त्यांनी आपण कसे वाचकसंस्कृतीच्या विरोधात आहोत हे दाखवून दिले आहे. एखादा चांगला वाचक हा पुस्तक हातात घेऊन त्यात काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करतो. ते कसे लिहिले हे समजून घेतो. तर एखादा रद्दीचा व्यापारी तेच पुस्तक हातात घेऊन त्याचे वजन पाहून त्यातून आपला किती फायदा होईल हे पाहतो. अशी ही समाजातील दोन भिन्न संस्कृती असतात. ते चालणारच. सोनियाजींनी या पुस्तकाच्या माध्यमातून देशाच्या गेल्या काही वर्षात हरवलेल्या विचारांच्या राजकारणाला पुन्हा एकदा सुरुवात करुन दिली आहे. त्याबद्दल आणि पुस्तकाच्या मोठ्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे.
Sonia Gandhi’s book is a success