उष्णतेच्या लाटेत पशुपक्ष्यांनाही विसरू नका!

वाढत्या उष्म्यात काळजी घेण्याचे मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : प्रतिनिधी
देशभरात अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आणि वाढत्या तापमानाचा कहर पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशातील नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ’एक्स’वर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी लोकांना घराबाहेर पडताना नेहमी सोबत पाणी ठेवण्याचा आणि सतत पाणी पिऊन
स्वतःला हायड्रेटेड ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या कडक उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजणे हे माणुसकीचे मोठे काम ठरेल, असे सांगत त्यांनी नागरिकांना एकमेकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
उष्णतेच्या झळांमुळे लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आणि उन्हात काम करणार्‍या मजुरांना सर्वाधिक फटका बसतो, याकडे पंतप्रधानांनी विशेष लक्ष वेधले. चक्कर येणे, मळमळ किंवा अतिथकवा यांसारख्या उष्माघाताच्या प्राथमिक लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, असा इशारा त्यांनी दिला. जर तुमच्या आजूबाजूला एखाद्या व्यक्तीला अशक्तपणा किंवा त्रास जाणवत असेल, तर त्याला त्वरित सावलीत किंवा थंड ठिकाणी नेऊन पाणी आणि ’ओआरएस’ देण्याचा सल्ला त्यांनी दिला. यासोबतच, आपल्या घरातील आणि नात्यातील ज्येष्ठ नागरिकांची वेळोवेळी विचारपूस करून त्यांना भर दुपारी घराबाहेर न पडण्याची आठवण करून देण्यासही त्यांनी सांगितले आहे.
माणसांसोबतच वाढत्या तापमानाचा आणि उन्हाचा मोठा फटका मुक्या प्राण्यांना आणि पक्ष्यांनाही बसतो, याची आठवण करून देत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्याप्रति संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहन केले. या कडक उन्हाळ्यात आपण आपल्या सभोवतालच्या पशुपक्ष्यांनाही लक्षात ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले.
नागरिकांनी आपापल्या घराबाहेर, बाल्कनीत, गच्चीवर किंवा कार्यालये आणि दुकानांबाहेर एका लहानशा भांड्यात पाणी ठेवावे जेणेकरून ते पाणी एखाद्या तहानलेल्या पक्ष्यासाठी जीवनदायी ठरू शकेल. या कठीण दिवसांत सर्वांनीच भूतदया आणि करुणेने वागण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधानांनी
व्यक्त केले.

Don’t forget the animals in the heat wave!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *