प्रेमाचा त्रिकोण; आजपर्यंत पोलिस कोठडी
सिडको : प्रतिनिधी
शहरातील डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात प्रेमाचा त्रिकोण समोर आला असून, डॉ. नीलेश जेजुरकर याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणात अनैतिक संबंधाचा संशय असलेल्या जिल्हा रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. स्वाती चव्हाण हिला पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली. तिला काल न्यायालयात हजर केले असता, 22 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.
गंगापूर रोड येथील घरात डॉ. मनीषा जेजूरकर यांनी आत्महत्या केल्यानंतर माहेरच्या मंडळींनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी डॉ. नीलेश जेजुरकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
शहरातील गंगापूर रोडवरील रेवती ब्लू अपार्टमेंटमध्ये आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर (वय 40) यांनी दि. 6 मार्च 2026 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांची बहीण रोहिणी थोरात यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर या प्रकरणातील संशयित आणि मनीषा यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर यांनी विविध न्यायालयांत अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, नाशिक सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयानंतर अखेरीस 17 सप्टेंबर रोजी
सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तसेच न्यायालयाने त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नाशिक शहराच्या गुन्हे शाखा युनिट एकने 1 शुक्रवारी (दि. 18 सप्टेंबर) रोजी डॉ. नीलेश जेजुरकर यांना बेड्या ठोकल्या होत्या. यानंतर त्यांना शनिवारी (दि. 19) रोजी नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 22 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, गुन्ह्याची व्याप्ती व गांभीर्य विचारात घेऊन या प्रकरणाचा तपास सरकारवाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये डॉ. नीलेश जेजुरकर यांच्यासोबत नाशिक जिल्हा रुग्णालयात काम करणार्या डॉ. स्वाती चव्हाण या महिलेला अटक करण्यात आली आहे. स्वाती आणि नीलेश यांचे अनैतिक संबंध असल्याची चाहूल मनीषा जेजुरकर यांना लागली होती असा आरोप मनीषा यांच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलीस चौकशीत डॉ. नीलेश जेजुरकर यांनी स्वाती यांच्या नावाचा उल्लेख केल्याने त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, डॉ. मनीषा जेजुरकर यांनी पतीच्या अनैतिक संबंधांमुळेच स्वत:ला संपवलं का? असा सवाल डॉ. स्वाती चव्हाण यांच्या अटकेमुळे उपस्थित केला जात आहे.
पोलिस कोठडीला विरोध
डॉ. स्वाती चव्हाण हिला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलीस कोठडीला तीव्र विरोध करत डॉ. चव्हाण यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. डॉ. चव्हाण तपासाच्या अनुषंगाने आतापर्यंत नऊ वेळा पोलिसांसमोर हजर झाल्या आहेत. यावेळी त्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून, त्यांचे छायाचित्रही घेण्यात आले आहे. त्यामुळे यापूर्वीच तपासासाठी सहकार्य केले असताना आता पोलीस कोठडीची आवश्यकता काय आहे, असा सवाल बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित केला. दोन्ही आरोपींमध्ये प्रेमसंबंध असल्याचे गृहीत धरले तरी मृत व्यक्तीला कोणता त्रास देण्यात आला किंवा अन्य काही प्रकार घडला का, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. त्यामुळे डॉ. चव्हाण यांना पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, अशी मागणी वकिलांनी केली. मात्र, सरकारी वकीलांनी तपासासाठी डॉ. स्वाती चव्हाण यांची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
Dr. Swati Chavan arrested in connection with Jejurkar’s death.