मौजे सुकेणे : प्रतिनिधी
गेल्या सहा महिन्यांत खाद्यतेलाच्या दरात सुमारे 10 ते 12 टक्क्यांनी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह गृहिणींच्या स्वयंपाकघराचे अर्थकारण कोलमडले आहे.
खाद्यतेल दरवाढ तक्ता (प्रति लिटर)
खाद्यतेल सहा महिन्यांपूर्वी आजचा दर वाढ
सोयाबीन तेल 150 165 15
सूर्यफूल तेल 160 176 16
शेंगदाणा तेल 190 209 19
मोहरी तेल 170 187 17
सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून, दरमहा सरासरी 2 टक्क्यांनी दर वाढल्यामुळे घरगुती खर्चाचा ताळमेळ घालणे कठीण बनले आहे. या महागाईचा थेट फटका आहारावर पडत आहे, नागरिकांना तेलाचा वापर कमी करावा लागत आहे. व्यापार्यांच्या मते, कच्च्या तेलाच्या आयात खर्चात झालेली वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि वाहतूक खर्च यांमुळे खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. आगामी सणासुदीच्या काळात मागणी वाढणार असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या महागाईवर गृहिणींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, सरकारने त्वरित हस्तक्षेप करून खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात आणाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यांपूर्वी आहारात खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला होता; मात्र सरकारने तेलाचे भाव एवढे वाढवले आहेत की, नागरिकांना नाइलाजाने आहारातील तेलाचे प्रमाण कमी करावे लागले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
– अर्चना बोरस्ते, गृहिणी, कसबे सुकेणे
Edible oil prices have risen by a staggering 10 to 12 percent in six months.