धरण उशाशी तरी प्रभाग 9 उपाशी!

दोन दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
दुष्काळाचे सावट दूर होऊन धरणे तुडुंब भरली आहेत. पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, महापालिकेच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे. धरण उशाशी आणि नागरिक उपाशी, अशीच काहीशी भयंकर परिस्थिती प्रभागात निर्माण झाली असून, ऐन पावसाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पावसाच्या पाण्यावर दिवस भागवावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर
आला आहे.
नगरसेवक दिनकर पाटील, नगरसेविका भरती धिवरे, संगीता घोटेकर आणि माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांचा पाहणी दौरा व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेकडो महिलांचा संतापाचा उद्रेक झाला. तुम्ही भरगच्च पगार घेता, मग पाणी का देत नाही? काम करायला जीवावर येते का? अशा शब्दांत संतप्त महिलांनी महापालिकेचे अधीक्षक अभियंता आणि इतर अधिकार्‍यांना अक्षरशः धारेवर धरले.
पिण्याचे पाणी तर लांबच राहिले, पण घरात शौचालयाला वापरासाठीसुद्धा पाणी उरलेले नाही. पाणी आल्यावर अवघ्या दोन बादल्या भरल्या की नळाचे पाणी निघून जाते. एकाच वेळी पाणी द्या, पण किमान पूर्ण दाबाने आणि पुरेसे द्या, अशी मागणी महिलांनी केली. नळाला पाणी येत नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात छतावरून पडणार्‍या पावसाच्या पाण्यावर दिवस ढकलावे लागत असल्याची लाजीरवाणी वस्तुस्थिती महिलांनी मांडली. यावेळी मनपा पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता आडेसरा, शाखा अभियंता बालाजी सूर्यकर, कनिष्ठ अभियंता राऊत यांच्यासह स्थानिक नागरिक वैशाली बाविस्कर, अलका बोराडे, हिराबाई धुरधवळे, छाया जावरे आदींसह शेकडो महिला उपस्थित होत्या. संतप्त महिलांचा आक्रमक पवित्रा पाहून उपस्थित अधिकार्‍यांची चांगलीच धांदल उडाल्याचे बघावयास मिळाले.

अधिकार्‍यांना फक्त पैसे खाणारे विभाग हवेत!
धरण पूर्ण भरले आहे, महापूर आला आहे आणि प्रभागात तब्बल चार-चार जलकुंभ उपलब्ध आहेत. तरीही पाणी का मिळत नाही? पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून महापालिकेच्या अनेक महासभा गाजल्या, पण प्रश्न सुटत नाही. पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांना फक्त बांधकाम विभागासारखे पैसे खाणारे विभाग हवे आहेत, काम करायचा पाणीपुरवठा विभाग नको आहे! दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास पाणीपुरवठा अधीक्षक अभियंत्यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन मांडू. – दिनकर पाटील, नगरसेवक

अधिकार्‍यांची सारवासारव; कारवाईचे आश्वासन
या समस्येत मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे. सर्व संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ लेखी आदेश दिले जातील. जे अधिकारी कामचुकारपणा करत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. येत्या दोन दिवसांत प्रभागातील पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लावला जाईल.
– रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, मनपा पाणीपुरवठा विभाग

पाणी न मिळाल्यास थेट चोप देणार!
अधिकारी फक्त प्रभागात येतात, चकरा मारतात आणि निघून जातात. प्रश्न कधीच मार्गी लागत नाही. शासनाकडून भरगच्च पगार घेतात, मग काम करायला यांच्या जीवावर येतं का? यापुढे जर पाणीप्रश्न सुटला नाही तर अधिकार्‍यांना थेट चोप दिल्याशिवाय पर्याय उरणार नाही.
– अलका बोराडे, नागरिक

पावसाच्या पाण्यावर दिवस भागवत आहोत
पिण्याचे पाणी तर सोडाच, नित्यक्रमाच्या कामासाठी आणि शौचालयासाठीही पाणी उरलेले नाही. सध्या पावसाच्या पाण्यावर कसेबसे दिवस भागवत आहोत.
– वैशाली बाविस्कर (नागरिक)

Even with a dam right at the doorstep, Ward 9 goes thirsty!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *