न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान उच्चारला गेलेला ‘झुरळ’ हा शब्द, सोशल मीडियावर तयार झालेली कॉक्रोच जनता पार्टी, त्यावरून निर्माण झालेली रील्सची लाट, विद्यार्थ्यांच्या भावना, रस्त्यावर उतरलेले आंदोलन, सरकारने केलेले दडपशाहीचे प्रयत्न आणि अखेरीस शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा ही घटना केवळ पेपरफुटीपुरती मर्यादित नाही.
ती लोकशाहीतील एका मोठ्या बदलाची चाहूल आहे. ही घटना एकच प्रश्न विचारते, जेव्हा तरुणाई शांत असते, तेव्हा सत्ताधार्यांना लोकांच्या प्रश्नांची आठवण का होत नाही? प्रश्न पेपरफुटीचा नव्हता. प्रश्न होता विश्वासाचा. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य अक्षरशः भरकटले. वर्षानुवर्षांच्या अभ्यासावर एका क्षणात पाणी फिरले. परीक्षा म्हणजे गुणवत्ता सिद्ध करण्याचा मार्ग, पण जर प्रश्नपत्रिकाच बाजारात विकली जात असेल, तर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर?
ही वेदना एका राज्यापुरती मर्यादित नाही. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात भरती प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक व्यवस्थेतील त्रुटी आणि भ्रष्टाचाराविषयी तरुणांच्या मनात प्रचंड असंतोष आहे.
पण या वेळी काही वेगळे घडले. तरुणांनी केवळ संताप व्यक्त केला नाही; त्यांनी डिजिटल माध्यमातून जनमत उभे केले, रस्त्यावर उतरले आणि सत्तेला निर्णय घ्यावा लागला. लोकशाहीत सर्वांत मोठी ताकद खुर्चीची नाही, जनतेची असते.
इतिहास सांगतो की,
जेव्हा सामान्य माणूस आपल्या प्रश्नासाठी एकत्र उभा राहतो, तेव्हा कितीही बलाढ्य सत्ता असली तरी तिला निर्णय घ्यावाच लागतो. लोकशाहीत निवडणुका पाच वर्षांनी होतात; पण जनमताचा कौल रोज लागत असतो. लोकांच्या प्रश्नांकडे सतत दुर्लक्ष करणारी व्यवस्था शेवटी लोकांच्या संतापासमोर टिकत नाही. पेपरफुटी आज-उद्या पाणी, वीज, रस्ते, रोजगार? आज आंदोलन विद्यार्थ्यांनी केले.
उद्या हेच आंदोलन पुढील प्रश्नांवर होऊ शकते…
गावागावातील पाणीटंचाई
दिवसेंदिवस खालावत चाललेले रस्ते
अपूर्ण महामार्ग
वर्षानुवर्षे रखडलेल्या औद्योगिक वसाहती, रखडलेल्या पाणीयोजना
बेरोजगारी
भरतीप्रक्रियेतील विलंब
दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या
शेतकर्यांचे प्रश्न
सरकारी कार्यालयातील विलंब, लालफीतशाही आणि भ्रष्टाचार
शहरांतील वाहतूक, कचरा, ड्रेनेज आणि मूलभूत नागरी सुविधा
या सर्व समस्या नवीन नाहीत.
त्या अनेक वर्षांपासून त्याच फाइलमध्ये अडकून पडलेल्या आहेत. लोकप्रतिनिधी जनतेसाठी की पक्षासाठी? आज अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींचे प्राधान्यक्रम बदललेले दिसतात.जनतेच्या प्रश्नांपेक्षा पक्षीय बैठका, गटबाजी, सोशल मीडियावरील प्रसिद्धी, निवडणुकीची गणिते आणि सत्तेतील स्थान यालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना अनेक नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, आमदार असोत किंवा खासदार, लोकशाहीतील प्रत्येक पदाचा केंद्रबिंदू नागरिक असायला हवा. लोकप्रतिनिधी हे सत्तेचे मालक नसतात, ते जनतेचे विश्वस्त असतात. सोशल मीडिया आता केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही. पूर्वी आंदोलनासाठी महिनोन्महिने संघटन उभे करावे लागत होते.आज एका मोबाइलमधून तयार झालेला एक व्हिडिओ, एक रील, एक हॅशटॅग किंवा एक व्यंगचित्र लाखो लोकांपर्यंत पोहोचते. जे प्रश्न वर्षानुवर्षे दाबून ठेवले जातात, ते काही तासांत राष्ट्रीय चर्चेचा विषय बनतात. म्हणूनच आजची सत्ता केवळ विरोधी पक्षाला नव्हे, तर जागृत नागरिकाला घाबरते.
इशारा कोणासाठी?
या आंदोलनाने केवळ एका मंत्र्याचा राजीनामा घेतलेला नाही. त्याने देशभरातील सत्ताधार्यांना एक संदेश दिला आहे. तो म्हणजे, जनतेच्या संयमाची परीक्षा सतत घेऊ नका. कारण जेव्हा सामान्य नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला, दिव्यांग आणि तरुण एकत्र येतात, तेव्हा कोणतीही व्यवस्था बदलू शकते.
लोकशाहीतील धडा
कोणाचीही सत्ता कायमची नसते. खुर्च्या कायमच्या नसतात.पक्ष कायमचे नसतात. कायम राहते ती फक्त जनता आणि जनतेच्या मनात निर्माण झालेला असंतोष जेव्हा आंदोलनात रूपांतरित होतो, तेव्हा इतिहास नव्याने
लिहिला जातो.
शेवटचा प्रश्न
आज विद्यार्थ्यांनी सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले.उद्या पाणी, वीज, रस्ते, रोजगार, भ्रष्टाचार, शेतकरी, दिव्यांग, उद्योग, नागरी सुविधा आणि प्रशासनातील निष्क्रियतेविरोधात जर नागरिक संघटित झाले तर त्याकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही सरकारला शक्य होईल का?
कदाचित ही केवळ एका आंदोलनाची कथा नाही. ही जागृत होत असलेल्या भारताची नांदी आहे. लोकशाहीत सत्ता जनतेने दिलेली असते. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे वेळेवर लक्ष देणे ही कोणत्याही सरकारची जबाबदारी आहे. अन्यथा इतिहास पुन्हा पुन्हा सांगतो, जेव्हा लोक शांत असतात तेव्हा सत्ता निर्धास्त असते, पण जेव्हा लोक जागे होतात तेव्हा सत्तेलाच जाग येते.
The youth taking to the streets heralds a major change in democracy!