पंतप्रधान मोदी यांचे आवाहन : मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
पश्चिम आशियातील युद्धसंकट आता चौथ्या आठवड्यात प्रवेश करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. 27) सायंकाळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक घेतली. देशाच्या इंधन आणि ऊर्जापुरवठ्याची सज्जता सुनिश्चित करणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील संकट आणि जागतिक तेलपुरवठा साखळी विस्कळीत होण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये ’टीम इंडिया’ भावनेने समन्वय साधणे, हे या बैठकीचे मूळ सूत्र होते. कोविड-19 महामारीच्या काळात ज्याप्रमाणे केंद्र आणि राज्यांनी एकदिलाने काम केले, तीच भावना आता या जागतिक संकटातही दाखवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
अमेरिका-इस्रायलने 28 फेब्रुवारी रोजी इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या या संघर्षावर मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांशी प्रथमच थेट संवाद साधला. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या निवडणूकबद्ध राज्यांचे मुख्यमंत्री आदर्श आचारसंहितेमुळे या बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत. मात्र, या राज्यांच्या मुख्य सचिवांशी कॅबिनेट सचिवालयाद्वारे स्वतंत्र बैठक घेण्यात आली. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला बैठकीत सहभागी झाले आणि नागरिकांनी इंधन पॅनिक बाइंग करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
यापूर्वी पंतप्रधानांनी लोकसभेतील संबोधनात स्पष्ट केले होते की, युद्धाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 3,75,000 हून अधिक भारतीय नागरिक सुरक्षितपणे भारतात परतले आहेत, ज्यात इराणमधील सुमारे एक हजार जण समाविष्ट आहेत. त्यांपैकी 700 हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी आहेत. भारताने आपल्या ऊर्जा आयात स्रोतांचा विस्तार गेल्या 11 वर्षांत 27 देशांवरून 41 देशांपर्यंत केला असून, एकाच प्रदेशावरील अवलंबित्व कमी केले आहे, हे दूरदर्शी धोरण आजच्या संकटात भारताचे कवच ठरत आहे.
या बैठकीपूर्वी, संसद परिसरात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली, ज्याला गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पेट्रोलियममंत्री हरदीप पुरी यांच्यासह काँग्रेस, समाजवादी पार्टी, सीपीआयएमच्या नेत्यांनी हजेरी लावली.
टीम इंडिया’ मंत्रावर एकवटण्याचा संकल्प
थोडक्यात, पश्चिम आशियाचे वारे भारताला झळ लावण्यापूर्वीच मोदी सरकारने सावधगिरीचा मजबूत तट उभारण्यास सुरुवात केली आहे आणि ’टीम इंडिया’ या एकाच मंत्रावर देश एकवटण्याचा संकल्प केला आहे.
विरोधी पक्षांचा पाठिंबा
महत्त्वाचे म्हणजे, सर्व विरोधी पक्षांनी संकटाचा सामना करण्यासाठी सरकारच्या उपाययोजनांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधानांनी खत उपलब्धता, आयात स्रोतांचे विविधीकरण, निर्यातीसाठी नवे बाजारपेठ शोधणे आणि वीजपुरवठ्याची अखंडितता राखणे अशा अल्पकालीन, मध्यकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला.
Face the crisis with center-state coordination