भविष्यात कृषी योजनांच्या लाभापासून राहणार वंचित
लासलगाव : वार्ताहर
राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकर्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा उद्देश शेतकर्यांचे उत्पन्न वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि आर्थिक सुरक्षितता देणे हा आहे. मात्र, आता शासनाकडून शेतकर्यांसाठी फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक)अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा फार्मर आयडी न काढल्यास भविष्यात अनेक महत्त्वाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकर्यांना मिळणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शेतकर्यांनी वेळीच फार्मर आयडी काढणे अत्यावश्यक ठरणार आहे.
फार्मर आयडी हा प्रत्येक शेतकर्याला दिला जाणारा एक ओळख क्रमांक आहे. आधार, सातबारा उतारा, बँक खाते आणि मोबाइल क्रमांक यांच्याशी ही आयडी जोडलेली असते. या ओळखीच्या आधारे शेतकर्याची जमीन, पीक पद्धत आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदवला जातो. शासनाच्या मते, यामुळे योजनांचा लाभ थेट पात्र शेतकर्यांपर्यंत पोहोचवणे सोपे होणार आहे. फार्मर आयडी नसल्यास शेतकर्यांना खालील महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे येऊ शकतात.
पीएम किसान योजना
दरवर्षी 6 हजार रुपये थेट खात्यात जमा होणार्या या योजनेचा लाभ फार्मर आयडी शिवाय पुढे मिळणार नाही, अशी शक्यता आहे.
पीक विमा योजना
प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहे. आयडी नसल्यास विमा अर्ज नाकारला जाऊ शकतो.
महाडीबीटीवरील अनुदान योजना
बी-बियाणे, खते, कृषी अवजारे, ठिबक व तुषार सिंचन, शेततळे, पॉवर टिलर, ट्रॅक्टर यांसारख्या योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना फार्मर आयडी बंधनकारक केली जाणार आहे.
कर्ज व व्याज सवलत योजना
पीक कर्ज, अल्पमुदतीचे कर्ज, कर्जमाफी किंवा व्याज अनुदान यासाठी फार्मर आयडी अनिवार्य केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे बँकांना शेतकर्यांची माहिती पडताळणी करणे सोपे होणार आहे.
नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई
अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पूर अशा आपत्तीत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांची यादी या आयडी च्या आधारे तयार केली जाणार आहे.
पीक खरेदी व हमीभाव योजना
शासकीय खरेदी केंद्रांवर आधारभूत किंमत () मिळवण्यासाठी देखील फार्मर आयडी बंधनकारक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फार्मर आयडी का महत्त्वाचा?
फार्मर आयडीमुळे बनावट लाभार्थी रोखता येतील, योजनांमध्ये पारदर्शकता येईल आणि शेतकर्यांना थेट लाभ मिळेल, असा सरकारचा दावा आहे. तसेच शेतकर्यांचा संपूर्ण डेटा एकत्र उपलब्ध झाल्याने भविष्यात नवीन योजना आखणे सोपे होणार आहे.
फार्मर आयडी कसा काढायचा?
फार्मर आयडी ऑनलाइन किंवा स्थानिक कृषी कार्यालय, सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून काढता येतो. आधार कार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक असतो.
Farmer ID now mandatory for farmers