निफाड तालुक्यातील चित्र; द्राक्ष, रब्बीच्या पूर्वतयारीचा खर्च दुप्पट
लासलगाव : वार्ताहर
सप्टेंबर महिना संपत आला तरी लासलगावसह निफाड तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने कृषी क्षेत्रावर मोठे संकट ओेढावले आहे. यंदा पावसाने दिलेल्या ओढीमुळे रब्बी हंगामाची पूर्वतयारी आणि द्राक्षबागा जगविण्यासाठी शेतकर्यांचा खर्च दुप्पट झाला. त्यामुळे बळीराजा पुरता अडचणीत सापडला आहे.
निफाड तालुका हा प्रामुख्याने द्राक्ष, ऊस आणि कांद्याचे आगार मानला जातो. मात्र, चालू हंगामात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी राहिल्याने तालुक्यातील विहिरी आणि कूपनलिकांच्या (बोअरवेल) पातळीत प्रचंड घट झाली आहे. द्राक्षबागा छाटणीच्या उंबरठ्यावर असताना पाणीटंचाई जाणवू लागल्याने शेतकर्यांना खासगी टँकर किंवा लांब अंतरावरून पाइपलाइन करून पाणी आणण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अपुर्या पावसामुळे पिकांवर विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकर्यांना महागड्या कीटकनाशकांची आणि विद्राव्य खतांची वारंवार फवारणी करावी लागत आहे. त्यातच डिझेलचे दर आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे प्रतिएकर शेतीचा खर्च कमालीचा वाढला आहे. तालुक्यात सध्या निर्माण झालेल्या या अभूतपूर्व परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
रब्बी हंगामावर अनिश्चिततेचे सावट
पाऊस नसल्याने जमिनीतील ओल संपुष्टात आली आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामातील नगदी पिके विशेषतः लेट खरीप व रब्बी कांदा लागवडीबाबत शेतकरी चिंतेत आहेत. पाण्याची उपलब्धता कमी असल्याने अनेक शेतकर्यांनी लागवडीचे क्षेत्र मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदा सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस पडेल अशी आशा होती, पण पावसाने दगा दिला. द्राक्षबागांच्या छाटणीचा काळ सुरू आहे. अशा स्थितीत पाणी विकत घेऊन बागा जगवण्याची वेळ आली आहे. शासनाने या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन तालुक्यात त्वरित उपाययोजना कराव्यात.
– प्रवीण वावधाने, द्राक्ष उत्पादक शेतकरी, भरवस फाटाकमी पाऊस, वाढता खर्च आणि सरकारच्या उदासीनतेमुळे आज महाराष्ट्राचा बळीराजा पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीची पाहणी करून द्राक्ष उत्पादक व रब्बीच्या पेरणीसाठी शासनाने शेतकर्यांना थेट आर्थिक मदत (हेक्टरी अनुदान) द्यावी. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करावा.
– गुणवंतराव होळकर, प्रवक्ते, जिल्हा काँग्रेस कमिटी
Farmers in distress due to scanty rainfall.