आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल
सिडको : प्रतिनिधी
महिलेच्या आई-वडिलांसह नातेवाइकांनी तिला तिच्या पतीच्या घरातून बळजबरीने घेऊन जात मारहाण केल्याचा, तसेच दुसरे लग्न लावून देण्यासाठी तिला नातेवाइकांच्या घरी डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आडगाव शिवारातील महालक्ष्मीनगर परिसरात तिच्या सासरी असताना तिची आई तेथे आली. ‘तुमच्या सासर्यांना अपोलो रुग्णालयात भेटायला जायचे आहे,’ असे सांगून आई, वडील, काका, मावशी आणि मामा यांनी महिलेला व तिच्या पतीला त्यांच्या वाहनात बसवून नेल्याचा आरोप आहे.
दरम्यान, शिंदे-पळसे टोलनाक्यापूर्वी महिलेच्या पतीला वाहनातून खाली उतरवून दिले. त्यानंतर महिलेला तिच्या मामाच्या नगरधन (ता. रामटेक, जि. नागपूर) येथील घरी नेण्यात आले.
तेथे आई-वडील आणि मामाने महिलेला मारहाण करून दुसरे लग्न लावून देण्याच्या उद्देशाने डांबून ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बहिरम करीत आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
Allegation that a woman was taken to her maternal home after her husband was dropped off near a toll plaza.