बदलत्या काळातील पितृत्व

– प्रतीक गंगेले
एक काळ असा होता की, घरातील वडील म्हणजे शिस्त, जबाबदारी आणि कर्तव्य यांचे दुसरे नाव मानले जायचे. त्यांच्या प्रेमापेक्षा त्यांचा धाक अधिक जाणवायचा. मुलांच्या शिक्षणापासून घरखर्चापर्यंत प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ते खांद्यावर घेत असत. मात्र, त्या बदल्यात त्यांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची फारशी मुभा समाजाने कधी दिली नाही. कुटुंबासाठी झटणारा, संकटात खंबीरपणे उभा राहणारा आणि स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारा ‘बाप’ हीच त्यांची ओळख बनली.
मात्र काळ बदलला, समाज बदलला आणि त्याचबरोबर पितृत्वाची व्याख्याही बदलली. आजचा वडील केवळ घराचा आर्थिक आधार राहिलेला नाही. तो मुलांचा मित्र आहे, मार्गदर्शक आहे, भावनिक आधार आहे. मुलांच्या पहिल्या पावलापासून ते त्यांच्या करिअरच्या निर्णयांपर्यंत तो सक्रियपणे सहभागी होताना दिसतो. एकेकाळी मुलांना शाळेत सोडणे, त्यांना खाऊ भरवणे, डायपर बदलणे किंवा घरकामात मदत करणे ही कामे प्रामुख्याने महिलांची मानली जात होती; परंतु आज अनेक वडील ही जबाबदारी आनंदाने स्वीकारताना दिसतात. बदलत्या समाजाने आणि स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांनी पितृत्वाला अधिक संवेदनशील आणि मानवी स्वरूप दिले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता, सोशल मीडिया आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात वाढणार्‍या नव्या पिढीसमोर वेगळीच आव्हाने आहेत. माहितीचा स्फोट, आभासी जगाचे आकर्षण आणि बदलत्या मूल्यव्यवस्था यांच्या दरम्यान मुलांना योग्य दिशा देण्याचे काम आजच्या वडिलांवरही आहे. त्यामुळे आधुनिक वडील केवळ पालक नाहीत, तर डिजिटल युगातील मार्गदर्शकही आहेत. परंतु या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट मात्र फारशी बदललेली दिसत नाही-वडिलांच्या भावनांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन.
आजही अनेक वडील आपल्या चिंता, भीती, अपयश आणि वेदना मनातच दडवून ठेवतात. पुरुष रडत नाही, खंबीर राहायलाच हवे, घरासाठी सर्व सहन करायचे अशा अपेक्षांच्या चौकटीत त्यांना आयुष्य घालवावे लागते. त्यामुळे अनेकदा त्यांचे संघर्ष दिसत नाहीत, फक्त त्यांचे कर्तव्य दिसते. आपण आईच्या त्यागाबद्दल बोलतो, बोलायलाच हवे; पण अनेकदा वडिलांच्या त्यागाचे स्वरूप शांत आणि निःशब्द असल्याने त्याची दखल घेतली जात नाही. मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या गरजा कमी करणारा, मुलांच्या स्वप्नांसाठी स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवणारा, घरातील प्रत्येक अडचणीसमोर भक्कम भिंतीसारखा उभा राहणारा हा माणूस अनेकदा कौतुकापेक्षा अपेक्षाच अधिक स्वीकारत असतो.
सोशल मीडियावर ‘माय बेस्ट डॅड’ किंवा ‘सुपरहिरो’ अशा पोस्ट्सचा वर्षातून एकदा पूर येतो. त्यात गैर काहीच नाही. उलट भावना व्यक्त करण्याचे ते एक माध्यम आहे. पण खरा प्रश्न असा आहे की, वर्षातील उर्वरित दिवसांत आपण आपल्या वडिलांना किती वेळ देतो? त्यांच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न कितीदा करतो? त्यांना शेवटचा तुम्ही कसे आहात? हा प्रश्न आपण कधी विचारला होता?
फादर्स डेचे खरे महत्त्व इथेच आहे. हा दिवस केवळ शुभेच्छांचा किंवा भेटवस्तूंचा नाही. हा दिवस आहे त्या व्यक्तीला समजून घेण्याचा, ज्याने आपले संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबासाठी खर्च केले. हा दिवस आहे त्यांच्या संघर्षांची दखल घेण्याचा, त्यांच्या त्यागाचे स्मरण करण्याचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनाही भावना आहेत, त्यांनाही आधाराची गरज असते, हे मान्य करण्याचा.
बदलत्या काळात पितृत्व अधिक संवेदनशील, अधिक समतोल आणि अधिक सहभागी होत आहे. त्यामुळे फादर्स डे हा केवळ एका नात्याचा उत्सव नाही; तर समाजातील या सकारात्मक परिवर्तनाचा सन्मान आहे. आधुनिकतेकडे वाटचाल करताना आपण तंत्रज्ञान स्वीकारत आहोत, नवीन विचार स्वीकारत आहोत; आता गरज आहे ती वडिलांच्या भावविश्वालाही समजून घेण्याची. कारण प्रत्येक यशस्वी मुलामागे केवळ एक प्रेमळ आईच नसते, तर अनेकदा स्वतःचे दुःख न बोलता गिळून टाकणारा, मुलांच्या भविष्यासाठी वर्तमानाशी झुंज देणारा आणि कुटुंबासाठी आयुष्य वेचणारा एक वडीलही असतो. यंदाचा फादर्स डे साजरा करताना एखादी भेटवस्तू द्या किंवा नका देऊ; पण थोडा वेळ जरूर द्या. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा. त्यांच्या संघर्षांचे आणि प्रेमाचे शब्दांत आभार माना. कारण अनेक वडिलांना आयुष्यभर ज्याची सर्वाधिक प्रतीक्षा असते, ती कोणती भेट नसते-तर आपल्या मुलांकडून मिळणारी जाणीव, आदर आणि दोन प्रेमाचे शब्द असतात. कदाचित म्हणूनच, फादर्स डे हा केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नाही; तो आपल्या आयुष्यात शांतपणे उभ्या असलेल्या त्या व्यक्तीला ‘आम्ही तुमचे ऋणी आहोत’ असे सांगण्याची एक संधी आहे.

Fatherhood in Changing Times

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *