नाशिक

राजमुद्री येथून येणार पंधरा हजार झाडे

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये 2027 मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली असली, तरी तपोवन परिसरातील प्रस्तावित साधुग्राम प्रकल्पामुळे 1800 झाडांची तोड होणार असल्यााने संतापाची लाट उसळली आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधुग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. या निर्णयाचा नागरिक, पर्यावरणप्रेमी, स्थानिक संघटना तसेच अनेक सेलिब्रिटींनी जोरदार विरोध केला आहे. एकीकडे नाशिकच्या तपोवनात वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरू असताना, राज्य सरकारकडून महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 15 हजार वृक्षलागवड केली जाणार आहे. यासाठी दक्षिण भारतातील राजमुद्री येथून झाडे आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः राजमुद्री येथे जाऊन 15 फूट उंचीची सुमारे 15 हजार देशी झाडे लिंब, जांभूळ, आंबा, पिंपळ, वड आदींची निवड केली आहे. ठिबक सिंचन आणि जैविक खतांचा वापर करून मनपा उद्यान विभागाच्या माध्यमातून झाडांची देखभाल केली जाणार आहे.
यातील एक ते दोन हजार झाडे येत्या आठवड्यात नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. साधुग्रामच्या जागेवरील एक्झिबिशन सेंटरचे टेंडर रद्द केल्यानंतर आता वृक्षलागवडीचा निर्णय सरकारने घेतला आहे. नाशिक शहरात आधी 15 हजार वृक्षलागवड करणार, त्यानंतरच साधुग्रामच्या उभारणीसाठी तपोवनातील झाडांना हात लावणार, त्यातील बहुतांश झाडांचे पुनर्रोपण करणार, अशी भूमिका मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केली असून, कामाला सुरुवात झाली आहे. नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत महापालिका प्रशासन आंदोलकांशी चर्चा करणार आहे. आंदोलकांना अधिकृतपणे चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. साधुग्राम उभारण्यासाठी काही झाडे काढावी लागतील, या प्रशासनाच्या भूमिकेनंतर आंदोलन तीव्र झाले आहे. दरम्यान, त्याच भागातील एक्झिबिशन सेंटर प्रकल्पालाही स्थगिती देण्यात आली असून, या डोममध्ये कुंभमेळ्यात साधू-महंतांची व्यवस्था करण्यात येणार होती. कुंभमेळ्यानंतर याच डोमचे एक्झिबिशन सेंटरमध्ये रूपांतर होणार होते. आता उद्याच्या चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होणार आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

2 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

2 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

2 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

3 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

3 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

3 hours ago