24 तासांत प्रशासनाची कारवाई
गांवकरी इम्पॅक्ट
देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
भगूर शहरातील आठवडे बाजार परिसरालगत टाकण्यात आलेल्या घनकचर्यामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील नवीन वसाहत, राजवाडा, दलित वस्ती परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. दुर्गंधी, डास-मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव, तसेच श्वसनाच्या समस्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा भगूर नगरपरिषदेकडे निवेदने देऊन हा कचरा अन्यत्र हलविण्याची मागणी केली होती. त्यानंतर नगरपरिषदेने संबंधित कचरा उचलून नवीन वसाहत परिसरालगतच्या नाल्यात व खड्ड्यात टाकल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली होती. परिसरातील महिला व नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, लहान मुले नाल्याजवळ खेळत असल्याने मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली होती. डास व दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे सांगितले. यासंदर्भात स्थानिक नागरिक भास्कर साळवे यांनी नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत परिसरातील परिस्थितीकडे लक्ष वेधले. याबाबतचे वृत्त दै. ’गांवकरी’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर नगराध्यक्षा, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकार्यांना नाल्यात पाइप टाकून ड्रेनेजचे पाणी पुढे सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. जेसीबीने प्रत्यक्ष साफसफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली.
Finally, the garbage dumped by Bhagur Municipal Council is cleaned up.