नाशिक हॉट डेस्टीनेशन; तापमान 41.2 अंशांवर

उष्णतेची तीव्र लाट;नागरिक हैराण

नाशिक : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात मंगळवारी उन्हाचा तडाखा अधिक तीव्र झाल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले. हवामान विभागाच्या नाशिक वेधशाळेने नोंदविल्यानुसार दि. 12 रोजी कमाल तापमान 41.2 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, तर किमान तापमान 23.7 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
दिवसभर प्रखर उन्हामुळे रस्त्यांवर दुपारच्या वेळेत नागरिकांची वर्दळ कमी दिसून आली. उष्म्याच्या लाटेमुळे थंड पेये, फळांचे रस आणि आइस्क्रीम विक्रीत वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
नाशिकमध्ये 42 अंशांचा तडाखा, हवामान विभागाचा यलो अलर्ट
सूर्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे नाशिककर अक्षरशः उष्णतेच्या झळांनी होरपळून निघाले आहेत. शहरातील कमाल तापमान सोमवारी (दि. 11) तब्बल 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून,काल दि.12 तापमान 41.2 अंशावर राहिले हवामान विभागाने आज दि.13 बुधवारपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. दिवसाबरोबरच रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
मार्चअखेरीपासून वाढू लागलेल्या उष्णतेने मे महिन्यात अधिकच तीव्र रूप धारण केले आहे. एप्रिलमध्ये सलग दोन दिवस 42 अंश तापमानाचा अनुभव घेतलेल्या नाशिककरांसमोर आता पुन्हा उष्णतेचा तडाखा उभा ठाकला आहे. सकाळी नऊ वाजेपासूनच उन्हाचा तडाखा बसण्यास सुरूवात झाली असून नोकरदार विद्यार्थी,कामगार वर्गाला भर उन्हात प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे टोपी.गॉगल घेत उन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.दुपारी दहा नंतर रस्त्यांवरील वर्दळ कमी होत असून, दुपारच्या वेळेत अंगाची लाहीलाही करणारे वातावरण निर्माण होत आहे.त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने जीवाची काहीली होत आहे.
नाशिक शहरात किमान तापमानही 26 अंशांवर गेल्याने रात्रीची उकाडाही असह्य ठरत आहे. घरांमध्ये उष्णता कायम राहत असल्याने नागरिकांची झोप उडाली असून, पंखे व वातानुकूलित यंत्रणांचा वापर वाढला आहे.परिणामी विजेच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. तसेच अनेक जण घराच्या गच्चीवर,टेरेसवर अंगणात झोपणे पसंत करीत आहेत परंतु बाहेरी वार्‍याचा अभाव असल्याने भर रात्रीही घामाच्या धारांनी अंग भिजले जात आहे.दरम्यान, दिंडोरी, मालेगाव परिसरात तब्बल 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.तर निफाड येथे पारा 46 अंशाचा आकडा गाठला आहे.
वाढत्या उष्णतेचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही दिसून येत असून, डोकेदुखी, अशक्तपणा, डिहायड्रेशन, अंगदुखी व उलट्यांच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालये आणि खासगी दवाखान्यांमध्ये उष्णतेशी संबंधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

अशी घ्या काळजी
तहान लागली नसली तरी वारंवार भरपूर पाणी प्या
घराबाहेर पडताना टोपी, छत्री किंवा रुमालाने डोके झाका
हलक्या रंगाचे सुती आणि सैल कपडे वापरा
प्रवासात पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत ठेवा
पाळीव प्राणी आणि जनावरांना सावलीत ठेवा व पुरेसे पाणी द्या

या गोष्टी टाळा
दुपारी 12 ते 3 या वेळेत प्रखर उन्हात बाहेर पडणे टाळा
चहा, कॉफी, शीतपेये आणि अतिसाखरयुक्त पेये कमी घ्या
उन्हात कष्टाची कामे किंवा व्यायाम टाळा
लहान मुले किंवा पाळीव प्राणी बंद वाहनात सोडू नका

तापमान आणि शरीरावर होणारे परिणाम
35 ते 40 अंश : शरीरातील पाण्याची कमतरता, जास्त घाम, डोकेदुखी, थकवा
40 ते 41 अंश : हृदयाचे ठोके वाढणे, स्नायूंमध्ये आकडी, चक्कर येणे
41 ते 42 अंश : उष्माघाताचा धोका, शुद्ध हरपणे, अंतर्गत अवयवांवर परिणाम होण्याची शक्यता

हवामान विभागाने नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

Nashik hot destination; Temperature at 41.2 degrees

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *