सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहरात मंगळवारी (दि. 3) रात्री अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धुडगूस घालत एकाच रात्री पाच बंद घरं फोडली. यामध्ये तीन ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही, पण दोन घरांतून मिळून 27 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकारामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं असून, नागरिकांत प्रचंड संताप आहे.
सर्व घरफोड्या एकाच पद्धतीनं केल्या गेल्या. बंद घरांचं कडी-कोयंडा तोडून आत शिरायचं, सामानाची उचकापाचक करायची आणि संधी मिळाली तर रोकड लंपास करायची, असा चोरट्यांचा डाव होता. पोलिस तपासात एकाच दुचाकीवर तिघे चोरटे, तोंडाला रुमाल बांधून आले असल्याचा संशय असून, काही ठिकाणचे सीसीटीव्ही
फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.
गंगोत्रीनगरातील ज्ञानेश्वर संभाजी करवर (51) हे घर बंद करून बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडला. कपाटात ठेवलेली 25 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानदा पार्कजवळ उद्योग भवन परिसरात राहणारे सैलानी नारायण भालेराव (45) हे मुलीच्या लग्नासाठी परभणीला गेले असताना त्यांच्या बंद घरातही चोरट्यांनी घरफोडी केली. दोन पंखे, रिकाम्या बॅगा हलवून घराची उचकपाचक केली; मात्र येथे त्यांच्या हाती काहीच लागलं नाही.
याच परिसरात सुधाकर मगर यांच्या घरातून दोन हजार रुपयांची रोकड चोरीला गेली, तर एखंडे यांच्या घरात चोरटे रिकाम्या हातानं परतले. संजीवनीनगर येथील हिराबाई मधुकर साबळे यांच्या बंद घराचाही दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तिथेही चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवनाथ अर्जुन पवार करत आहेत.
सर्व ठिकाणी बंद घरांनाच लक्ष्य केल्यामुळे चोरट्यांनी आधी रेकी करूनच ही धाड घातल्याचा संशय आहे. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केलं होतं; मात्र श्वान घरापासून रस्त्यापर्यंतच माग काढू शकला. त्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाल्याचा अंदाज आहे. तोंडाला रुमाल, हातात ग्लोज घालून चोरी केल्याचं पोलिस
सूत्रांनी सांगितलं.
Five closed houses were broken into in Sinnar in one night; over 27 thousand looted