आदिवासी वस्त्यांचा संपर्क धोक्यात; तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे म्हाळुंगी नदीला आलेल्या पुराने चास गावालगतच्या स्मशानभूमीजवळील फरशी पुलाचे मोठे नुकसान केले आहे. पुलाच्या पुढील भागाला मोठे भगदाड पडून रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याने कासारवाडी हद्दीतील ठाकरवाडीसह अनेक आदिवासी वस्त्यांचा संपर्क धोक्यात आला आहे. प्रशासनाने त्यावर भराव करून तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र, तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत असून, सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी आलेल्या पुराच्या प्रचंड वेगवान प्रवाहामुळे चास येथील स्मशानभूमीजवळील फरशी पुलाच्या पुढील भागाची मोठ्या प्रमाणात धूप होऊन गोलाकार भगदाड पडले. शनिवारी सकाळी पाणी ओसरल्यानंतर नुकसानीचे चित्र स्पष्ट झाले. चास गावाच्या दक्षिणेकडील मधे वस्ती, कातोरे वस्ती, कडाळे वस्ती, काळशेतवाडी, वारे वस्ती, खैरनार वस्ती तसेच ठाकरवाडीसह अनेक आदिवासी वस्त्यांतील नागरिकांना चास गावात ये-जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून वाहतूकही धोकादायक बनली आहे.
पाच वर्षांपूर्वी या पुलाची उंची वाढवून नव्याने बांधकाम करण्यात आले होते. मात्र यंदाच्या पुराने पुलाच्या पुढील भरावालाच तडा देत रस्त्याचा काही भाग खचला. त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागला.
माजी सरपंच लक्ष्मण मधे, भारत कडाळे, एकनाथ कडाळे, अशोक मधे, विष्णू मधे, मारुती मधे, खंडू मधे आदी ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने पुलाची दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता अविनाश सहाणे, माजी सरपंच चंद्रशेखर खैरनार आणि ऋषीकेश बर्के यांनी घटनास्थळी पाहणी करून आवश्यक उपाययोजनांच्या
सूचना दिल्या.
पूरहानी निधीतून कायमस्वरूपी दुरुस्ती करणार…
पुलाचा वाहून गेलेला भराव भरून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर पूरहानी निधीतून कायमस्वरूपी दुरुस्ती व मजबुतीकरणाचा प्रस्ताव सादर केला जाईल. तोपर्यंत नागरिकांनी या पुलावरून अवजड वाहने नेऊ नयेत.
– अविनाश सहाने, उपअभियंता, बांधकाम विभाग, पं.स. सिन्नर
स्मशानभूमीचीही मोठी हानी
म्हाळुंगी नदीच्या महापुराचा फटका चास गावालगतच्या स्मशानभूमीलाही बसला आहे. नदीकाठाची मोठ्या प्रमाणात धूप झाल्याने संरक्षक भिंतीलगतची माती वाहून गेली असून, काही ठिकाणी जाळीचेही नुकसान झाले आहे. परिसरात गाळ, झाडांच्या फांद्या आणि कचरा साचल्याने स्मशानभूमीचा परिसर धोकादायक बनला आहे.
Flood havoc; breach in the causeway near Chas.