दमण-दादरा नगरहवेलीचे विदेशी मद्य जप्त

वाघेरा चौफुलीजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
दमण व दादरा नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक व तस्करी उघडकीस आणत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील ‘ड’ विभागाने मोठी कारवाई केली. या कारवाईत विदेशी मद्य व बिअरच्या एकूण 38 पेट्या तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन असा एकूण सात लाख 37 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, 23 ऑक्टोबर 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हरसूल-आंबोली रोडवरील वाघेरा चौफुली, वाघेरा शिवार (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथे पाळत ठेवण्यात आली होती. यावेळी संशयित रिट्झ चारचाकी वाहन तपासणीसाठी थांबविण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता, त्यात दमण व दादरा नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या व बिअरच्या एकूण 38 पेट्या आढळल्या. संबंधित वाहनाचा नोंदणी क्रमांक एमएच 15-सीजी 3025 असा आहे.
याप्रकरणी वाहनचालक सुमितकुमार जयसुखभाई पटेल (वय 25, रा. चीकर फलिया, प्राथमिक शाळेजवळ, काकडकोपार, जि. वलसाड, गुजरात) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मद्यासह वाहनाची एकूण किंमत सात लाख 37 हजार 440 रुपये असल्याचे विभागाने नमूद केले आहे. जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई निरीक्षक एन. एच. गोसावी व त्यांच्या विभागीय पथकाने केली. या मोहिमेत दुय्यम निरीक्षक एस. आर. इंगळे, के. एन. बाविस्कर, जी. बी. नागरगोजे, सहायक दुय्यम निरीक्षक विष्णू सानप यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. वाहनचालक महेश खामकर यांनीही कारवाईत सहकार्य केले. अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 अथवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 8422009993 वर माहिती द्यावी.

Foreign liquor seized in Daman-Dadra & Nagar Haveli

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *