नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
मैत्रिणीच्या घरी गेलेल्या महिलेच्या पर्समधून घराची चावी चोरून, त्याच चावीच्या मदतीने तिच्या घरातील सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्याच्या दोन लगडींसह चार लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शोभाबाई बाविस्कर, अर्चना पाटील, मंगेश पाटील आणि सागर जाधव, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना मानकर (30, रा. पगारे मळा, उपनगर) यांनी 3 सप्टेंबर 2026 रोजी याप्रकरणी फिर्याद दिली होती. 21 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान त्या ओळखीच्या शोभाबाई बाविस्कर यांच्या घरी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या पर्समधील घराची चावी नजर चुकवून काढून घेण्यात आली. त्यानंतर या चावीच्या मदतीने घराचे कुलूप उघडून लाकडी पलंगात ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची पर्स चोरी करण्यात आली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपींकडून सुमारे पाच ग्रॅम वजनाची 70 हजार रुपये किमतीची सोन्याची लगड आणि 31.930 ग्रॅम वजनाची तीन लाख 60 हजार रुपये किमतीची दुसरी सोन्याची लगड जप्त करण्यात आली. दोन्ही लगडींची एकूण किंमत चार लाख 30 हजार रुपये आहे. या कारवाईमुळे उपनगर पोलीस ठाण्यात दाखल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहायक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक शांताराम हंबाळे, सुनील बडे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, हवालदार संदीप पवार, विनोद लखन, जयंत शिंदे, प्रशांत देवरे, सुनील गायकवाड यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी आणि महिला अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास हवालदार संदीप पवार करीत आहेत.
पगारे मळ्यातून दोघांना अटक
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी गुन्हेशोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान अर्चना पाटील आणि मंगेश पाटील हे पगारे मळा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सागर जाधव याला शेलार मळा, कॅनॉल रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यातील संशयित शोभाबाई बाविस्कर ही अन्य एका गुन्ह्यात अटकेत आहे. ती नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेद्वारे तिला या गुन्ह्यात वर्ग करून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी चौघांना अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.
Theft committed at a female friend’s house using a key; four arrested