शहराची अवस्था नांगरलेल्या शेतासारखी

खासदार राजाभाऊ वाजेंचा संताप

पहिल्याच पावसाने रस्त्यांच्या दुरवस्थेवरून आक्रमक

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरातील रस्त्यांची दिवसेंदिवस खालावत चाललेली अवस्था आणि मान्सूनपूर्व पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवरून खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करत खा. वाजे यांनी प्रशासनाला कठोर शब्दांत इशारा दिला आहे.
शहरात मंगळवारी (दि. 2) मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यावेळी रस्त्यांची खरी अवस्था समोर आली. अनेक भागांत रस्त्यांवरील डांबरीकरण उखडले असून, मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. विशेषतः शहरी विस्ताराच्या नव्या भागांत, तसेच वाढत्या लोकवस्तीच्या परिसरात रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाल्याचे नागरिकांकडून सातत्याने निदर्शनास आणून दिले जात आहे.
खासदार वाजे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक हे महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने विकसित होणार्‍या शहरांपैकी एक असून, औद्योगिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. अशा शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था ही केवळ पायाभूत सुविधांच्या कमतरतेचे लक्षण नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित बाब आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिक त्रस्त, वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. विशेषतः अंबड, सातपूर, इंदिरानगर, सिडको, पंचवटी, मखमलाबाद, गंगापूररोड, नाशिकरोड तसेच शहरालगतच्या नव्या विकसित होणार्‍या भागांत रस्त्यांची अवस्था चिंताजनक बनल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे करताना नियोजनाचा अभाव, मंजुरी आणि निधीला झालेला उशीर, ठेकेदारांवर नसलेला वचक आणि घिसाडघाई यामुळे शहराची ही विदारक अवस्था झाली आहे. मागील काही वर्षांत कॉलनी रस्ते, तसेच नव्याने झालेल्या वस्त्यांमध्ये याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहर नांगरून ठेवलेल्या शेतासारखे झाले आहे.
– खा. राजाभाऊ वाजे, नाशिक

महापालिकेकडे प्रमुख मागण्या
शहरातील सर्व खड्डेमय रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी.
निकृष्ट दर्जाची कामे करणार्‍या संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी.
मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीसाठी विशेष कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी.
शहराच्या विस्तार क्षेत्रात दीर्घकालीन आणि टिकाऊ रस्ते विकासासाठी स्वतंत्र नियोजन करावे.

कुंभमेळ्याच्या नावाने पळवाट
प्रशासनाला रस्ते खोदण्याबाबत आणि रस्त्यांच्या अवस्थेबाबत प्रश्न विचारल्यानंतर प्रशासन सातत्याने कुंभमेळ्याच्या कामामुळे हा त्रास सहन करावा लागेल, अशी सबब सांगितली जाते. मात्र, नियोजनाचा अभाव, मंजुरी आणि निधीला झालेला उशीर, तसेच ठेकेदारांवर नसलेला वचक हे मूळ कारण असल्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पत्रात म्हटले आहे.

 

The city is like a plowed field.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *