त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकासासाठी 50 कोटींचा निधी मंजूर

राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; विकासकामांना येणार गती

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील श्री त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून जिल्हाधिकारी नाशिक यांना वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. नियोजन विभागाने 9 डिसेंबर 2025 रोजी हा शासननिर्णय जारी केला.
शासनाने त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 275 कोटींच्या विस्तृत आराखड्यास मंजुरी दिली होती. त्या अनुषंगाने मंजूर कामांसाठी चालू आर्थिक वर्षातील तरतुदीतून 50 कोटींच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे. हा खर्च लेखाशीर्ष 5452 – पर्यटनावरील भांडवली खर्च (मोठी बांधकामे) या खात्यातून करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वरतील तीर्थक्षेत्र विकासाची बहुसंख्य कामे आगामी कुंभमेळ्याशी संलग्न असल्यामुळे कामांची एकसूत्रता, वेळेवर अंमलबजावणी व योग्य सनियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी हा निधी थेट कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. प्रत्यक्ष खर्च आणि महालेखापाल कार्यालयाच्या नोंदीतील खर्च यांचा ताळमेळ घालण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी नाशिक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच वितरित निधीबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास तत्काळ सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. कुंभमेळ्याची काही कामे तीर्थक्षेत्र विकास निधीतून करण्याबाबतचे
निर्देश प्रशासनाने दिले होते. त्यानुसार तीर्थक्षेत्र विकास योजनेत 300 कोटींच्या विकासकामांचा समावेश करून वेगळा आराखडा सादर करण्यात आला होता. मंत्रिमंडळाने 275 कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली होती. आता 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रातील मूलभूत सुविधा, पर्यटक सेवा, घाट क्षेत्र विकास आणि कुंभमेळ्याशी संबंधित कामांना आता गती मिळणार आहे.

तीर्थक्षेत्र विकास योजनेत समाविष्ट कामे

दर्शनपथांचे सुशोभीकरण, पुरातन मंदिरे व कुंडांची देखभाल-दुरुस्ती, शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण, वाहनतळांची उभारणी, स्वच्छतागृहांची वाढ आणि नूतनीकरण, अतिक्रमित पूजा साहित्य दुकानदारांचे पुनर्वसन, परिसरातील मंदिरांचे नूतनीकरण व सक्षमीकरण, दर्शन पाथ, स्नानघाटांची बांधणी

निधी वितरणाचा तपशील

मंजूर आराखडा : 275 कोटी
चालू आर्थिक वर्षासाठी मंजुरी : 50 कोटी
निधी वितरित : जिल्हाधिकारी, नाशिक
निधी वापर : त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रातील मंजूर विकासकामांसाठी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *