नाशिक

गंधारवाडीत कायमच अस्वच्छता; अद्याप घंटागाडी आलीच नाही

प्रभाग सहामध्ये लोकप्रतिनिधी येतात फक्त मतदानापुरतेच

पंचवटी : नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक सहामध्ये वन विभागाच्या बाजूला जवळपास 500 ते 550 मजूरवर्गाची गंधारवाडी ही नागरी वस्ती आहे. या गंधारवाडीत घंटागाडी योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत कधीच आली नाही. त्यामुळे परिसरात कायम अस्वच्छता राहत असून, तेथील नागरिकांचे आरोग्यदेखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांत अनेक निवडणुका झाल्या; परंतु लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरतेच फिरकले असून, आता तरी नवनिर्वाचित नगरसेवक या गंधारवाडी वस्तीकडे फिरकतील, अशी आशा तेथील नागरिक बाळगून आहेत.

प्रभाग क्रमांक सहामध्ये वन विभागाच्या बाजूला गंधारवाडी वस्ती आहे. जवळपास 500 ते 550 इतकी लोकवस्ती असून, या ठिकाणी 300 ते 350 मतदार आहेत. या भागात निवडणूक आली की, मतदान घेण्यापुरते उमेदवार फिरतात; पण निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षांत एकही लोकप्रतिनिधी फिरकत नाही, अशी खंत येथील नागरिकांनी बोलून दाखवली. या ठिकाणी फक्त बागूल कुटुंबातील व्यक्तींनी दखल घेतली गेल्याचे सांगून त्यांनीच या वस्तीत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता करून दिल्याचे सांगितले. गंधारवाडीकडे जाण्यासाठी पूर्वी गंगापूर कॅनॉलकडून जाण्यासाठी वन विभागाने रस्ता करून दिला होता. त्याचीही दुरवस्था झाली असून, धड सायकलसुद्धा चालवता येत नाही अशी अवस्था झाली आहे.
काळानुसार या भागात बदल झाला. मखमलाबादकडून आसारामबापू पुलाकडे जाणारा रस्ता झाला. त्यामुळे याच भागातून चांदशीकडे कच्चा रस्ता झाल्याने या रस्त्याने गंधारवाडीकडे जाता येते. परंतु तोही रस्ता खराब आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नागरिकांच्या नशिबी मात्र वनवासच आहे, असेही येथील नागरिक सांगतात.
ज्या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू आहे, तिथंपर्यंत महानगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी येतात; परंतु गंधारवाडी येथे कुठल्याही प्रकारची स्वच्छता केली जात नाही. या ठिकाणापर्यंत आजपर्यंत एकदाही घंटागाडी आली नसल्याने तेथील नागरिकांना इतरत्र ओला व सुका कचरा टाकावा लागत आहे. वस्तीच्या बाजूला मोठा नाला असल्याने याच नाल्यात कचरा टाकला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गंधारवाडीच्या बाजूला चांदशी शिवार येतो. गंधारवाडीकडून चांदशीकडे जाण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे. त्यामुळे चांदशीकडून पूल ओलांडून गंगापूर रोडकडे येणारे नागरिक घरातील कचरा याच पुलाच्या बाजूला टाकत असल्याने पुलाच्या कडेला आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून येतो. त्यामुळे आता तरी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का, असा प्रश्नदेखील गंधारवाडीतील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पत्र्याच्या शेडमध्ये उभारली जिम
गंधारवाडीमध्ये अनेक मजुरी करणारे युवक राहतात. या ठिकाणी एक पत्र्याचे शेड बांधण्यात आले असून, शेडमध्ये पूर्वी अंगणवाडी भरायची, असे येथील नागरिकांनी सांगितले. मात्र, लगतच शाळा व अंगणवाडी असल्याने पत्र्याच्या शेडमध्ये येथील युवकांनी व्यायामासाठी जिम सुरू केली. यामध्ये जिम साहित्य देण्यात आले असून, तेथील जिम साहित्य अस्ताव्यस्त पडून असल्याचे दिसून आले.

मनपा शाळा बंद करू नये
या वस्तीत नाशिक मनपाची शाळा असून, ती शाळा बंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. परंतु, येथील शाळा ही मनपा क्रमांक 14 च्या अंतर्गत सुरू आहे. येथील विद्यार्थ्यांना मखमलाबाद गावातील मनपा शाळा चार ते पाच किलोमीटर असून, त्यांना जाण्या-येण्यासाठी वन विभागातून जावे लागते. वन विभाग असल्याने या ठिकाणी हिंस्र प्राण्यांचा वावर होत असल्याने येथील विद्यार्थी मखमलाबाद गावात जाऊ शकत नाहीत. या शाळेत 30 ते 40 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक असून, शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग एकत्र भरवले जातात. जर ही शाळा बंद केली तर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी ही शाळा बंद न पडू देता ती सुरू राहण्यासाठी प्रयत्न करावे.
– उत्तमराव खराटे, स्थानिक रहिवासी

Gandharwadi is always dirty; the bell has not arrived yet

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

2 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago