गॅस सिलिंडर मिळेना; संतप्त ग्राहकांनी एजन्सीला ठोकले टाळे

बुकिंग करूनही वितरण नाही, घरगुती सिलिंडर काळ्या बाजारात विक्रीचा आरोप

सिन्नर : प्रतिनिधी
बुकिंग करूनही घरगुती गॅस सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ग्राहकांनी सिन्नरमधील गणेश पेठेतील शहा गॅस एजन्सीच्या कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र निषेध व्यक्त केला. संतप्त ग्राहकांनी एजन्सी कार्यालयाच्या चाव्या तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी विवेक जमधडे यांच्याकडे सुपूर्द केल्या व तातडीने कारवाईची मागणी केली.
गणेश पेठेतील शहा गॅस एजन्सीकडे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची एजन्सी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.
बुकिंग करूनही वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. घरगुती वापराचे गॅस सिलिंडर काळ्या बाजारात विकले जात असल्याचा आरोपही ग्राहकांनी केला.
या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 15) दुपारी सुमारे साडेबारा वाजेच्या सुमारास ग्राहकांनी एजन्सी कार्यालयाला टाळे ठोकत आंदोलन केले. संबंधित एजन्सीवर कारवाई करून गॅस सिलिंडरचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अन्यथा ग्राहकांचे कनेक्शन इतर एजन्सीकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन पुरवठा निरीक्षण अधिकारी विवेक जमधडे यांना देण्यात आले.
दरम्यान, जमधडे यांनी सेल्स ऑफिसर यांच्याशी संपर्क साधून प्रकरणाची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी संबंधित एजन्सीला भेट देऊन आवश्यक सूचना दिल्या होत्या. यापूर्वीही ग्राहकांनी पुरवठा विभागाकडे एजन्सीबाबत तक्रारी केल्या असल्याने आता प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनावेळी मोहचे सरपंच प्रदीप साळवे, विजय आव्हाड, काशीनाथ सांगळे, अनिल देशमुख, निखिल धुमाळ, सुवर्णा कोकाटे, तुकाराम वारुंगसे, नामदेव शिंदे, रामकृष्ण भालेराव, शंकर वामने, जिजाबाई सुखे, मच्छिंद्र गिते, सोमनाथ गुंजाळ, उत्तम सानप, मनीषा ठोक यांच्यासह तालुक्यातील ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gas cylinder not available; Angry customers slam agency

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *